पोलीस अधिक्षकांनी घेतला अवैध धंद्यावरील कारवाई व हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांचा आढावा…
वाशिम जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी 16 ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे आदेश देवून यादरम्यान जिल्ह्यातील माहितगार गुन्हेगार,वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार आणि हिस्ट्रीशीटवर असलेले गुन्हेगार तपासण्याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी दिले होते. त्याबाबतचा आढावा श्री. बच्चन सिंह यांनी घेतला.
वरील कालावधीत जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनअंतर्गत विशेष पथके तयार करुन 109 हिस्ट्रीशिटर, 120 माहितीगार गुन्हेगार, दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले 120 आरोपी तपासण्यात आले. तसेच जातीय दंगल करणारे एकूण 475 गुन्हेगार तपासण्यात आले. दारुबंदी कायद्यान्वये 64 केसेस दाखल करुन कारवाई करण्यात आली. त्यात 1 लाख 8 हजार 850 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये 40 केसेस दाखल करुन 85 इसमांविरुध्द कारवाई करुन 48 हजार 71 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
गुन्हेगारी प्रवृत्तीला जिल्ह्यात वचक बसावा यासाठी जेलमधून सुटलेल्या आरोपीवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात येते. जिल्ह्यात अशाप्रकारे गुंडगिरी करणारे, अवैध धंदे करणाऱ्या इसमाविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरीकांनी गुंड प्रवृत्तीच्या इसमाविरुध्द न घाबरता पुढे येवून पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवावी. जेणेकरुन गुंड प्रवृत्तीच्या इसमांच्या मुसक्या आवळता येतील. असे आवाहन पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे.