0 0
Read Time:16 Minute, 51 Second
डॉ. स्वाती प्रमोद आंबेकर लिखित.....मी आणि कोरोना
रोजच्या प्रमाणे मी क्लिनिक ला गेले होते तिथे नेहमी सारखी वर्दळ नव्हती.. थोड़े पेशेंट माझी वाट पाहत बसलेले होते. पुणे जिल्ह्यामधील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द माझं गाव पण पोटच्या पोरीसारखी माया करणारी माणसे असणार गांव, शेतकऱ्यांचं गाव तस म्हणायला सधन, तसं साध-सुध पण वैचारिक आणि बुद्धिवादी लोकांचा वारसा लाभलेल गांव.. जेमतेम पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या छोट्याश्या गावात इथे एकही करोना पेशेंट नाही असं आम्ही गर्वाने सांगत होतो. खर सांगायचं तर काही लोक कोरोनावर जोकही करत होते कधीकधी हासायलायही यायच! माझ्या बऱ्याच नातेवाईकांनी आणि जवळच्या व्यक्तींनी काळजीपोटी मला दवाखाना बंद ठेव असे सांगितले होते. मी रुग्णसेवेचे काम हाती घेतल्यामुळे डॉ. या नात्याने स्वतःचे क्लिनिक बंद ठेवण्याचा स्वार्थी विचार माझ्या मनात येऊ शकत नव्हता. मी माझे क्लीनिक चालू ठेवले होते व स्वतःची काळजी घेऊन पेशंटची तपासणी करून त्यावर उपचार करत होते. पण थोडी भीती होतीच. अचानक आमच्या मांजरी मध्ये एक करोना पॉझिटिव्ह पेशंट सापडल्याने एकच  खळबळ उडाली..  
आणि नेमका तोच पेशंट माझ्या क्लिनिक ला येऊन गेलेला होता, त्यामुळे काळजीपोटी म्हणून मी लगेच दुसऱ्या दिवशी माझी कोरोना टेस्ट (कोविड 19) करून घेतली. रिपोर्ट पोझिटीव्ह तर येणार नाय ना? या विचाराने मला रात्रभर झोप लागत  नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी लॅब मधून फोन आला, ते म्हणाले  डॉक्टर मॅडम तुमची टेस्ट निगेटिव्ह आली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला आणि देवाचे आभार मानले. माझ्या बरोबर माझ्या सर्व शुभचिंतकांना ही हायस वाटलं.
सदरचा कोरोना पेशंट माझ्या क्लीनिक ला आल्यामुळे मला 14 दिवसांसाठी घरीच qurantine केलं गेलं होत.            
चार दिवसांनी पुन्हा बातमी येऊन धडकली की आमच्या गावात मांजरी मध्ये अजून एक करोना पॉझिटिव्ह पेशंट सापडला त्यामुळे गावामध्ये तर पूर्ण घबराटच पसरली आणि तो पेशंट सुद्धा माझ्या क्लीनिक ला येऊन गेला होता. पण माझी अगोदरची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे मी फारसं टेंशन घेतलं नव्हतं, पण सेफ साईड व माझ्या वकील पतीच्या सांगण्यावरून खर तर आग्रहावरून मी पुन्हा टेस्ट करून घेतली पण मला माहीत नव्हतं माझी गाठ पडणार होती चीनी पाहुनी बाई शी.. 
माझी दुसरी टेस्ट मात्र पोझिटिव्ह आली. आता मात्र पायाखालची वाळू सरकली. सकाळी 9 वाजता नवऱ्याने आपल्याला वाघोली ला लगेच जाव लागेल अस सांगितल आणि  त्यांनी उसने अवसान दाखवून मन जड़ करून तुला काही नाही होत, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत धीर देण्याचा प्रयत्न केला, सासु- सासऱ्यांना तर काहीच सुचेना, सासूने बैग भरली आणि मी आणि माझे मिस्टर आमच्या गाडीतून वाघोली सरकारी दवाखान्या मध्ये जाण्यासाठी निघालो मिस्टरांनी तोपर्यंत माझ्या भावाला फोन करून आम्ही वाघोली ला येत असल्याचे सांगितले माझे माहेर सुद्धा वाघोली आहे.
वाघोली सरकारी दवाखाना
जिथे पेपर फॉर्मेलिटी चालू होती तिकडे माझे आई, वडील, भाऊ व इतर अनेक  जण लगेच माझ्या काळजीपोटी पोहचले होते.आता पर्यंत थोड़ फार मन घट्ट होत ते पार लोनी झाले.. आई भरल्या डोळ्याने रडू नको बाळा बोलली, तिथे सगळ्यांनी जणू ऐकून न ऐकल्या सारखे करत दुसरीकडे पाहिले. मी आई जवळ जावून तिच्या गळ्यात पडून रडू शकत नव्हते, दुःख आजारापेक्षा एकटं पडण्याचा वाटत. सरकारी दवाखान्यातील सर्व फॉर्मलिटीज झाल्यानंतर लगेचच एम्बुलेन्स आली. मी खूप जड मनाने एम्बुलेंस च्या आत गेले आणि माझ्या व आई मध्ये फ़क्त एम्बुलेन्स ची काच होती. ती जवळ येवून खप रडली. पण काचेमुळे दोन तीन फुटाचे अंतर कोसो दूर वाटत होत. 
त्याचवेळी  जेव्हा त्या करोना निवारण पथकाने सांगितल की पेशंट सोबत इतर  कोनालाही जाता येणार नाही तसेच गाडीच्या मागे जाऊ नये व पोलिसांना सहकार्य करावे.. तेव्हा अस वाटलं मला कोनी दूर देशात ओढून नेतय आणि माझ्या घरचे माझा नवरा, माझा भाऊ सगळे फ़क्त माझ्याकडे बघतायत. जेवढी नजर जाईन तो पर्यंत ते माझ्या कड़े नजर लावून बघत होते, जणू माझ्यासाठी खूप रडत होते.. पूर्ण गाडित मी एकटीच होते.. एम्बुलेंस ची मला सवय नव्हती अस काही नाही.. कित्येक पेशंट ला डॉक्टर असल्यामुळे मी स्वतः एम्बुलेंस मधून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, पण आज स्वतः पेशंट म्हणून जाताना ते ही आशा आजरा सोबत ज्याने संपूर्ण जग थांबवल होत.. भीतीं ने डोळे पुसायला हाथ ही उचलत नव्हते.. माझ्याशीच अस का? देवाला प्रश्न विचारत होते. पाया खालची जमीन हादरने म्हणजे काय या शाळेमध्ये शिकलेल्या म्हणीचा अर्थ आणि प्रत्यय मला आला होता.. 
एम्बुलेंस खूपच जोरात पळत होती रोड चे पुलिस सहानुभूति ने अंबुलन्सच कडे बघत होते.
                                                                                      *दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल…*             
एकदाची मी हॉस्पिटल जवळ पोहोचले आणि मी एम्बुलेन्स मधून खाली उतरले. तिथे जमलेले लोक मला एका वेगळ्याच नजरेनं पाहत होते आणि माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयन करत होते. करोना बद्दल लोकांच्या मनात असलेली प्रचंड भीती त्यांच्याकडे पाहून मला स्पष्ट जाणवत होती. हॉस्पिटल आणि  हॉस्पिटल स्टाफ मला काही नविन नव्हते, पण आज मला हे भीतीदायक आणि नकोसं वाटत होतं, मी जत्रेत हरवलेल्या लहान मुला सारखी सतत रडत होते. कधी कधी गोष्टी त्याच असतात पण परिस्थिति ने त्या किती वेगळे अर्थ देवून जातात.. आणि तिथुन पुढे मला एडमिशन काउंटर ला स्वतःच स्वतचा अड्मिशन करायच होत नेहमीसारख गरज असेल तेव्हा सोबतीला असणार अस कोणीच नव्हतं. 
अड्मिशन चे पैसे माझ्या हातात होते. पण माझं पैशाकडे व मोबाइल कड़े अजिबात लक्ष नव्हते पण त्या वेळी कोणीही ते पैसे किंवा मोबाईल सहज चोरू शकत होते. पण त्यावेळी एक कळले की जीव महत्वाचा आहे पैसे नाही. त्यानंतर मला हॉस्पिटलच्या casualty डिपार्टमेंट मध्ये नेल गेलं. तिथेच असणाऱ्या एका लेडी डॉक्टर मला खुपच मदत केली आणि हा एक रहिलेच तिथे एक दुसऱ्या एम्बुलेंस चे ड्राइवर होते, त्यांना मला पाहून खुप वाईट वाटलं आणि जवळ येवून पानी चहा काही देऊ का अस विचारले. बऱ्याच जणांना शब्दात व्यक्त होत येत नाही. पण काही छोट्याशा विचारपूस करण्यान खूप बरं वाटत. चहा पानी रोजचचं पण परिस्थिति ने त्या वाक्याने जीवात जीव आणला.. त्यानंतर मला एक रूम देण्यात आली. जिथे मला काही दिवस लॉक करणार होते!……
*पार्ट 2*
जेव्हा सिस्टर मला रूम मधे सोडून गेल्या मला ती रूम खुप भयानक वाटत होती. एकटेपणा काय असतो मला जनावायला लागल होते. ती रात्र एकदम भयानक रात्र होती, सर्वात मोठं टेंशन होत की आमच्या ह्यांचा आणि सासू सासऱ्यांचा करोना टेस्ट रिपोर्ट काय येईल, मनातून श्री विठ्ठलाला खूप प्रार्थना करत होते, की सगळ्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह येउ दे म्हणून…. फार प्रयत्नाने पहाटे झोप लागली.. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच मिस्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तेव्हा कुठं माझा जीव भांडयात पडला…. थोडं हायस वाटलं…. कधी कधी माणूस एकाच वेळी अनेक संकटांशी लढू शकत नाही. हॉस्पिटलचे डॉक्टर आले व त्यांनी खुप चांगला दिलासा दिला व व्यवस्थित चेक केल.. लोकांना गैरसमज आहे की करोना पेशंट ला नीट बघत नाही पण असं नाही,  डॉक्टर लोक खुप चांगल्या रीतीने आधार देतात.. 
दूसरा दिवस पहिल्या दिवसापेक्षा फार वेगळा होता, फार वेगळा जणू देवाने मला काही वेगळी विचारसरणी दिली होती.. मी म्हटल बस्स स्वाती आता तू  रडायचं नाही लढायचं आहे.. ही तू नाहीच नुसतं रडणारी.. आता ह्या परिस्थिति ला नीट धैर्याने सामोरं जायच. अनुभव मोठा शिक्षक असतो असे म्हणतात. तिथून पुढे प्रत्येक दिवशी काय ट्रीटमेंट देतात, कशी प्रोग्रेस होतेय सगळं लिहून ठेवल कदाचित माझा हा अनुभव इतराना कामी येईन म्हणून.. माझं हे ऑब्झरवेशन मला माझ्या इतर पेशंट साठी कामी येईन.. करोना वर वॅक्सिंन येण्यास नक्की किती दिवस लागतील हे आज तरी कुणालाच सांगता येणार नाही तोपर्यंत एव्हढंच सांगते की आपल्या देशामध्ये आता इथून पुढचा काळ खूप संघर्षाचा असणार आहे. सर्वांनी आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वानी कोमट पाणी प्या,  थंड पदार्थ खाऊ नका, शक्य असेल तर योगा किंवा घरी व्यायाम करा, मास्कचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा, बाहेरून घरात आल्यावर स्वच्छ हात पाय धुवा, सॅनिटायझर वापरा आणि सर्वात महत्त्वाचे सरकारच्या आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करा. दहा दिवस मी स्वतःसाठी कोरांनाशी लढत होते.
 खरतर जीवन आणि मृत्यूचीच लढत ही! मधल्या काळात मला अनेकांचे फोन व मेसेज आले. कुणी म्हणल लवकर बऱ्या व्हा आपण हत्तीवरून साखर वाटू. प्रचंड दाबावतही अशा वेळी हसायला आलं. कुणी म्हटलं स्वाती तू खरी फायटर आहेस. अनेकांनी फोन करून या वातावरणातही खूप हसवल, बऱ्याच वेळा कॉन्फरन्स कॉल करून मला एकट पडू दिल नाही.जस मला काही झालंच नाही. आजारपणात होसला वाढवणारे पडद्यामागचे योद्धेच असतात खर तर. माझी मस्करी करणाऱ्यांनी याही वेळ मला सोडलं नाही खरतर त्यामुळेच मला मानसिक आधार मिळाला. काहींना प्रेमापोटी फोनवर बोलताना हुंदका आवरला नाही. खरतर मलाही त्यावेळी रडणं आवरलं नाही. अनेकांनी माझं मनोबल वाढवण्यासाठी काही माझे फोटोंचे काही व्हिडीओ बनवून मला पाठवले. काहींनी माझी सेम टू सेम नक्कल करून मला व्हिडीओ पाठवले. खरतर या सगळ्यांना मूळे माझा एकटेपणा काहीसा दूर झाला. उद्या मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे! पुढचे काही दिवस मला कॉरंनटाइन राहावं लागणार आहे. 
सर्वांच्या प्रेमामुळे, पाठिंबा दिल्यामुळेच माझं सासर, माहेर, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, गावकरी , मांजरी खुर्द ग्रामपंचायत, कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणारे स्वयंसेवक यांच्यासह हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सेस , स्टाफ इ. च्या सहकार्यामुळे ही लढाई मी जिंकलेली आहे..त्यामुळे माझ्या वर सार्थ विश्वास दाखवणाऱ्या तसेच माझ्या काळजी पोटी मला फोन करून अथवा इतर मार्गाने विचारपूस करून धीर देणाऱ्या अनेक कळत नकळत सहकार्य करणाऱ्यांनाच, डॉक्टर, नर्सेच,अंबुलन्सचे ड्राइवर  महाराष्ट्र शासनच, आरोग्य खात्याच, पोलिसांचं,  अगदी या लढाईत सामील असणाऱ्या छोट्यातल्या छोट्या घटकांपासून मोठ्यातल्या मोठ्या घटकापर्यंत अगदी सर्वांचाच व माझ्या सगळ्याच शुभचिंतकाचे शतशः कोटी कोटी असं आभार मानते.
….. या कोविड 19 मुळे देशातीलच नव्हे तर जगातील अनेक लोकांचे हाल होत आहे. कोरणाच्या  प्रतिबंध करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या लसीला लवकरात लवकर यश येवो व ही लस तयार करणाऱ्या सर्वांना यश येऊदे व हे सर्व जगावरच संकट टळुदे ही श्री विठ्ठल चरणी प्रार्थना!! खर तर मी लेखिका नाही. अनुभवलं, मनात आलं ते लिहिलंय. माझं स्वभाव थोडासा जास्त बोलका असल्यामुळे थोडं जास्त लिहलय. सहन करून वाचाल या अपेक्षेसह!
डॉ. स्वाती प्रमोद आंबेकर

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *