अटल भूजल योजना । ‘चला जाणूया नदीला’ अभियानात अटल भूजल योजनेविषयी जनजागृती
लातूर, दि. २२ जानेवारी (आजचा साक्षीदार) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘चला जाणूया नदीला’ अभियानाला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. सारसा येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते ‘अटल भूजल योजना’विषयक जनजागृती मोहिमेच्या माहिती प्रसारण केंद्राचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, ॲस्ट्रानॅटिकल इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीचे संशोधक विद्यार्थी शतद पुरोहित, मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे मराठवाडा समन्वयक अनिकेत लोहिया, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक एस. बी. गायकवाड यावेळी उपस्थित होते. अटल भूजल योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्यांना व गावात निवड करणेत आलेले भूजल मित्रांना यावेळी ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांना वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. गायकवाड यांनी अटल भूजल योजनेविषयी जिल्हास्तरावर तयार करण्यात आलेली माहितीपुस्तिका भेट दिली. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांनी ‘पावसाच्या पाण्याचे संकलन’ विषयी या स्वयंचलीत पुर्नभरण मॉडेली माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाला गावच्या सरपंच श्रीमती ज्योती हनुमंत भिसे, मुख्याध्यापक शंकर तोडकर, ग्रामसेवक एस. एस. कांबळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे श्री. पिटले, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे माहिती संवाद तज्ज्ञ एच. आर. नाईक, जिल्हा अमंलबजावणी भागीदारी संस्थाचे प्रकल्प समन्वयक कुलदिप कांबळे, अशोक सांगळे, सुनिल सोनकांबळे यांनी प्रयत्न केले.