अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
भंडारा, दि. 11 : खरीप हंगाम 2023-24 साठी जिल्हयात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने नियोजन केले आहे. पीक संरचनेतील बदल व खत वापराच्या शिफारशी प्रमाणे जिल्हयासाठी एकुण 89 हजार 318 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून 80 हजार 180 मे.टन खताचे आवंटन व 28 हजार 350 बॉटल नॅनो युरीयाचे आवंटन शासनाकडून प्राप्त झाले आहे. रब्बीतील सुमारे 29 हजार 526 मे.टन साठा जिल्हयामध्ये शिल्लक आहे.
जिल्हयात आगामी खरीप हंगामात बियाणे मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी कृषि विभागाने 2.02 लाख हेक्टरचे नियोजन केले आहे. यामध्ये जिल्हयातील प्रमुख पिक असलेल्या भात बियाणेचा यंदा 1.88 लाख हेक्टरवर लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी 45 हजार 183 क्विंटल बियाणे लागणार असून सोयाबीनसाठी 631 क्विंटल व तूर पिकासाठी 488 क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
बियाणे, खते व किटकनाशके यांचा काळाबाजार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी व गुणवत्ता पुर्ण बियाणे व खते शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्थरावर 1 व प्रती तालुका 1 याप्रमाणे एकुण 8 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. खत व बियाणे विक्रेत्यांच्या गोडावूनची तपासणी करण्यात येणार आहे. बियाणे व खतांच्या गुणवत्ते बाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. यासाठी जिल्हयात कोणीही अनधिकृत अथवा विना परवाना असलेले बियाणे विक्रीस आणू नये. अन्यथा संबधित विक्रेते, कंपनी अथवा असे कृत्य करणाऱ्या कोणत्याही खाजगी एजंट विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगिता माने यांनी कळविले आहे.