पुणे दि. १२ऑग २०२२ : स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण होते, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य आणि त्याग प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय पंचायतराज आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आगाखान पॅलेस येथे आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण आणि स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळ्याअंतर्गत श्री.पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, पंचायतराज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार विजय कुमार बेहरा, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ.राजेंद्र यादव, गांधी मेमोरियल सोसायटीच्या नीलम महाजन, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, मुंबईचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ आठवडे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे हा भाग्याचा क्षण आहे. स्वतंत्र भारताला विकासाची दिशा दाखविणारा आणि नव्या पिढीला देशासाठी त्यागाची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे.



देशात ४०० ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाच्या माध्यमातून देशगौरवाची भावना निर्माण होईल. येणाऱ्या काळात आपल्या देशाला जगात अग्रेसर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधीजींचे आगाखान पॅलेसमध्ये वास्तव्य असल्याने ही वास्तू स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरली. या वास्तूचे संवर्धन करतानाच ही वास्तू देशासाठी देणाऱ्या आगाखान यांच्या आठवणीही पुरातत्व विभागाने जपाव्यात, असे त्यांनी सांगितले

तिरंगा ध्वज देशाचा अभिमान – मंत्री चंद्रकांत पाटील


मंत्री श्री.पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाची माहिती आणि देशाच्या प्रगतीसाठी आपल्या क्षमतेचा उपयोग करावा याची प्रेरणा देण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन देशभर होत आहे.

तिरंगा ध्वज पाहिल्यावर मनात देशप्रेमाची भावना निर्माण होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढील तीन दिवस देशाला प्रेरणा देणारा तिरंगा ध्वज घरोघरी फडकवावा, हे करताना ध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.यादव म्हणाले, आगाखान पॅलेस नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत आहे. केंद्र सरकारकडून या वस्तूच्या विकास आणि संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. लवकरच येथे संग्रहालय सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळू शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी संबंधित ५ गडावर स्वराज्य महोत्सवाच्या निमित्ताने तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय व युद्धात वीर मरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.



श्रीमती महाजन यांनी आगाखान पॅलेसमधील ऐतिहासिक घटनांची माहिती दिली. दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने ही वास्तू उभारण्यात आली. आगाखान पॅलेस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण स्थान होते. याठिकाणी महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तूरबा गांधी, सचिव महादेवभाई देसाई, सुशीला नायर आणि अन्य नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. कस्तूरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचा याठिकाणीच मृत्यू झाल्यामुळे महात्मा गांधींना या ठिकाणाची विशेष ओढ होती. या दोघांची समाधी याठिकाणी आहे, असे त्यांनी सांगितले

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक आणि वारसा स्थळाचे पावित्र्य जपताना नव्या पिढीला अशा वास्तूंची आणि तिथल्या इतिहासाची माहिती करून देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांची माहिती विद्यार्थ्यांना देणाऱ्या अशा उपक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव विशेष ठरावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा जिल्हा आहे. या स्मृतींना उजाळा या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *