आवास योजनेंतर्गत घरकुलांचे लक्ष्यांक मार्चपर्यंत पुर्ण करा – सीईओ रोहन घुगे
वर्धा, दि. २७(आजचा साक्षीदार) : पंचायत समिती कारंजाच्या सभागृहात कारंजा व आष्टी पंचायत समितीची संयुक्त आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. घरकुलांसह विविध योजनांचे निर्धारीत लक्ष्यांक मार्चपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.ज्ञानदा फणसे, कारंजाचे गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, आष्टीचे गटविकास अधिकारी श्री.उखळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा मिशन व्यवस्थापक स्वाती वानखेडे उपस्थित होत्या.
बैठकीत पंचायत समिती स्तरावरून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा सविस्तर आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला. मिशन ग्रामोदय अंतर्गत येणाऱ्या गावांचा विकास आणि त्याबद्दल करावयाची कार्यवाही याबबत मार्गदर्शन करण्यात आले. वित्त आयोगाचा निधी तत्काळ खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सेसफंड मधील पात्र लाभार्थ्यांना लाभ देऊन त्यांचे अर्ज निघाली काढावे. नरेगाचा कृती संगम घडवून घरकुलची कामे तत्काळ पूर्ण करावी, तसेच आधार जोडणीची कामे लवकरात लवकर करण्याच्या सुचना बैठकीत श्री.घुगे यांनी केल्या.
पांदणरस्ते कामांना त्वरीत प्रशाकीय मान्यता देण्यात यावी. कुठलीही देयके प्रलंबित राहिल्यास त्यासाठी असणारी अनुज्ञेय रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्याकडून वसूल करण्यात येईल. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक स्वच्छतेची सर्व कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावी. सर्व छत लेव्हलपर्यंत आलेल्या घरकुलांची कामे मार्चपर्यंत पुर्ण करायची असून राज्य पुरस्कृत योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील लक्ष्यांक गाठण्यावर भर देण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या.
अंगणवाडीतील बालकांशी साधला संवाद – बैठकीनंतर श्री.घुगे यांनी कारंजा तालुक्यातील शेलगाव उमाटे या गावाला भेट देऊन अंगणवाडीतील बालकांची संवाद साधला तसेच अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचा आढावा घेतला. सॅम बालकांच्या प्रगतीसाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली. याच गावातील घरकुलांची पाहणी केली. शेलगाव उमाटे येथे भेट घेऊन समुदाय संसाधन व्यक्ती मंदा घागरे यांच्या कामाची माहिती जाणून घेतली.
कामांची पाहणी व गुणवत्ता तपासणी – कारंजा तालुक्यातीलच उमरी येथे आरोग्यवर्धिनी केंद्रास भेट व औषध उपलब्धतेची पाहणी केली. सार्वजनिक शौचालय व नाडेपच्या कामाची पाहणी आणि गुणवत्ता तपासणी केली. गावातील वॉटर ट्रीटमेंट प्लांटची पाहणी केली व प्लांट लवकर पुर्ण करण्याच्या सुचना केल्या. पांजरागोंडी येथे सेमी इंग्लिश शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सौरऊर्जेवर चालणारी ग्रामपंचायत व गोवर्धन प्रकल्पाला भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. चोपन्न या गावातील कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी केली व त्याच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या.