इ १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज आपले सरकार पोर्टलवरच ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन
आजचा साक्षीदार दि. 29 जानेवारी 2025: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सन २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार पोर्टलवर या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.
या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास सादर करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे.

खेळाडू विद्यार्थी/जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. त्या संदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू नये व असा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये असे निर्देश संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.