उद्योजकता विकास केंद्राचा बंजारा ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 मेपर्यंत प्रशिक्षण इच्छूकांनी संपर्क साधावा
वाशिम, दि. 12 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन 2023-24 अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या बंजारा ड्रेस मेकिंगवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बंजारा ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षार्थीना व्यक्तिमत्व विकास, बंजारा ब्लाऊज, कांचळी, फुलीया ताट झाकणी, बंजारा पंचवर्क, बंजारा ओढणी वर्क, बंजारा ड्रेस, बंजारा कसोट्या बाजूबंद, बंजारा पर्स वर्क, बंजारा ब्रासलेट कवडीवर्क, आटी हेअर अॅसेसरीज, पायातील पैजन, बंजारा वेतडू (नवरदेव पट्टा) दुल्हन ड्रेस आदी तयार करण्याबाबत थेअरी व प्रात्याक्षीक स्वरुपात प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी व व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, विविध कर्ज योजना व कर्ज प्रकरण तयार करणे, बँकेचे व्यवहार, प्रकल्प अहवाल तयार करणे ईत्यादीविषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम एक महिना कालावधीचा आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीला प्रमाणपत्र देवून विनामुल्य मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेद्वारे ऑनलाईन कर्ज प्रकरणे बँकेला पाठवून ३५ टक्के अनुदानाचा लाभ मिळविता येणार आहे. ४० प्रशिक्षणार्थीची या कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी हा किमान इयत्ता ७ वी पास किंवा पदवी/पदविका/ आय.टी. आय. प्रमाणपत्र किंवा कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारक असावा.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोगट १८ ते ४५ वर्ष आहे. लाभार्थी हा जिल्हयातील रहिवासी असावा. प्रवेशासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या www.mced.co.in या पोर्टलवर ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शैक्षणिक कागदपत्रांसह शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र, स्वतःचे नावे असलेले बँकखाते पासबुकची सत्यप्रत व दोन फोटो आदी कागदपत्रांसह बंजारा ब्राईड्स, आजर्व शॉपीच्यामागे, लॉनजवळ, काटा रोड, वाशिम येथे, तसेच अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक खुशाल रोकडे (7057968131) पुरुषोत्तम ठोंबे (9822108023) यांच्याशी 20 मे पूर्वी संपर्क करावा. असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.