कुणबी, मराठा-कुणबी , कुणबी – मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेत अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन…
अहमदनगर दि. 20 जानेवारी – जिल्ह्यामध्ये विविध शासकीय अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातींच्या सुमारे १ लाख ४७ हजार नोंदी आढळून आलेल्या आहेत. या नोंदींच्या आधारे सर्व पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
मोठ्या प्रमाणात सापडलेल्या या नोंदींच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासाठी सर्व तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत विशेष शिबिरांचे आयोजन दि. २६ ते ३० जानेवारी, २०२४ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे.
ही विशेष मोहीम राबविण्यापूर्वी २१ ते २५ जानेवारी, २०२४ या कालावधीमध्ये गाव पातळीवर त्या गावामध्ये आढळून आलेल्या नोंदींची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधितांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करता येतील.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, पात्र व्यक्तींनी कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जातीच्या प्रमाणपत्रासाठी या विशेष शिबिरांमध्ये कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. असे जिल्हा प्रशासना तर्फे प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविण्यात आले आहे.