कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर • 30जानेवारी पासून जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान
भंडारा, दि. २७(आजचा साक्षीदार) : कुष्ठरोग उपचारांनंतर पूर्णपणे बरा होतो त्यामूळे या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्हयात 512 कुष्ठरुग्ण आढळले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 515 इतकी झाली आहे. कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत स्पर्श अभियान राबविले जाणार आहे.
केंद्र शासनाने कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्या कार्यक्रमानुसार दरवर्षी कुष्ठरोगीचा शोण घेतला जातो. शोधमोहिमेत रुग्णांच्या आजाराची तीव्रता तपासली जाते. त्याची लक्षणे पाहिली जातात. रुग्णांची नोंद करुन उपचार सुरु केले जातात. अंगावर चेह-यावर गाठी तयार झालेल्या अवयवाची शासकीय रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाते. नवे रुग्ण शोधण्यासाठी दरवर्षी शोधमोहिम राबविली जाते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा आजार बळावता. गेल्या नऊ महिन्यात आढलेल्या 512 रुग्णांमध्ये 16 बालकांचा समावेश आहे. लहान मुलांच्या हाताच्या व पायाच्या बोटांमध्ये व्यंग आढळून येते, हे व्यंग औषधोपचाराने बरे होते. त्याचे राज्यातील प्रमाण सध्या 2.34 टक्के इतके आहे. पूर्वी असलेले व्यंगाचे प्रमाण आता कमी झाले आहे. सरकारी अथवा खासगी रुग्णालयातून आजाराचे योग्य निदान झाले व योग्य उपचार घेतले तर हा आजार बरा होतो. त्यामूळे घाबरून जाऊ नये, लक्षणे असतील तर त्वरीत तपासणी करावी व उपचार घ्यावे.
सहा महिने ते वर्षभरात रुग्ण होतो बरा – कुष्ठरोगाचे निदान झाल्यानंतर त्वरित उपचारांना सुरुवात करावी. शासकीय रुग्णालयात बहूवेध उपचार घेतल्यानंतर सहा महिने ते एक वर्षाच्या आत कुष्ठरोग दूर होतो. त्यामूळे लक्षणाकडे दुर्लक्ष करु नये त्वरित उपचार घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुष्ठरोगाविरुध्द लढा देवून कुष्ठरोगाला इतिहास जमा करू या – कुष्ठरोग हा आजार बहुविध औषधोपचाराने बरा होतो, भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी लवकर उपचार करणे आवश्यक आहे,कुष्ठरुग्णांसोबत कोणताही भेदभाव करु नये, ते समाजातील मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न करु. लवकर निदान,लवकर उपचार हे कुष्ठरोग बरा होण्याचे सुत्र आहे. शासकीय रुग्णालयात कुष्ठरुणांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. सद्या जिल्यातील 515 रुग्णांवर उपचार सुरु बाहेत. अशी माहिती आरोग्य सेवा कुष्ठरोगाचे सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र धनविजय यांनी दिली.