संभाजीनगर, दिनांक 05 : मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 18 सप्टेंबरला शहरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील पूर्वतयारी बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रन फॉर युनिटी संदर्भात आढावा बैठकीस पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, राज्य अथलेटिक संघटनेचे पंकज भारसाखळे, बापू घडमोडे उपस्थित होते.

रन फॉर युनिटीमध्ये सहभागींना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना डॉ.कराड यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या. टीएफआय आणि ग्रीन ग्लोब फाऊंडेशन आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या पुढाकाराने शहरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. सर्वांसाठी खुल्या असलेल्या दौडसंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना पोलिस प्रशासनाकडून करण्यात येतील, असे श्री. गुप्ता म्हणाले. टीएफआयच्या दीपक कोलते यांनी सादरीकरण केले. श्री. गटणे यांनी आभार मानले.









