खरीप हंगामात पीक स्पर्धेसाठी अर्ज मागविण्यात आले; शेतीतील नवप्रयोगांना प्रोत्साहन
महाराष्ट्र | ९ जुलै २०२५ : राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम २०२५ मध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांसाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धा राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
🔹 स्पर्धेचा उद्देश
राज्यातील उत्पादकतेत वाढ घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात केलेल्या प्रयोगशील शेतीचे कौतुक व प्रोत्साहन मिळावे, त्यांचे तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवून शेतीत नवोपक्रमाला चालना मिळावी, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.
🔹 सहभागी होण्यासाठी आवश्यक अटी
- शेतकऱ्याचे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक.
- संबंधित जमीन स्वतःकडूनच कसली गेली पाहिजे.
- स्पर्धकाला एकाचवेळी अनेक पिकांसाठी अर्ज करता येईल.
- भातासाठी किमान २० आर, इतर पिकांसाठी ४० आर (१ एकर) सलग लागवड असावी.
🔹 सहभागी होणारी पिके आणि अर्जाची अंतिम मुदत
पिके | अंतिम मुदत |
---|---|
मूग व उडीद | ३१ जुलै २०२५ |
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल | ३१ ऑगस्ट २०२५ |
🔹 प्रवेश शुल्क
- सर्वसाधारण गट – ₹300 प्रति पीक
- आदिवासी गट – ₹150 प्रति पीक
🔹 अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र – अ)
- प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
- सातबारा व आठ-अ उतारे
- जात प्रमाणपत्र (आदिवासींसाठी)
- नकाशा (घोषित क्षेत्र चिन्हांकित)
- बँक पासबुक (प्रथम पानाची छायांकित प्रत)
🔹 बक्षिसांचे स्वरूप
स्तर | पहिले बक्षीस | दुसरे बक्षीस | तिसरे बक्षीस |
---|---|---|---|
तालुका | ₹5,000 | ₹3,000 | ₹2,000 |
जिल्हा | ₹10,000 | ₹7,000 | ₹5,000 |
राज्य | ₹50,000 | ₹40,000 | ₹30,000 |
🔹 अधिक माहितीकरिता
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी www.krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.
उत्पादकतेला पुरस्कार देणारी ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे मार्गदर्शन करणारी ठरणार आहे.