‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ हा विशेष कार्यक्रम मंगळवारपासून आकाशवाणी केंद्रावर
हिंगोली दि.१६ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि आकाशवाणी केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्रामात हिंगोली जिल्ह्याने दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि आकाशवाणी परभणी केंद्र प्रमुख सतिष जोशी यांनी केले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तच्या परभणी आकाशवाणी केंद्रांवर 17 ते 20 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील तज्ज्ञ इतिहास अभ्यासक, प्राध्यापक यांनी हिंगोली जिल्ह्याने मुक्ती संग्रामात दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत. आकाशवाणी केंद्र परभणी येथून प्रसारित होणारा हा विशेष कार्यक्रम सकाळी 10.00 वाजता ऐकता येणार आहे.
यामध्ये मंगळवारी (दि. 17) ‘स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव नाईक यांचे हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील योगदान’ याविषयी प्रा. डॉ.महेंद्र इंगळे हे बोलतील. त्यानंतर बुधवारी (दि. 18) ‘मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्यातील स्वातंत्र्यवरीरांचे योगदान’याविषयी प्रा.डॉ.सुखदेव बलखंडे हे बोलतील. गुरुवारी (दि.19 ) विशेष कार्यक्रमामध्ये ‘स्वातंत्र्य सेनानी गंगारामजी कऱ्हाळे यांचे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील योगदान’ याविषयी प्रा. डॉ. रामभाऊ मुटकुळे यांनी दिलेली माहिती श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. शुक्रवारी (दि.20) ‘मुक्तीसंग्राम लढ्यात सर्व समाजाचा सहभाग’याविषयी मुख्याध्यापक संजय टाकळगव्हाणकर यांच्याकडून माहिती ऐकता येणार आहे.
सलग चार दिवस हिंगोली जिल्ह्याने दिलेल्या योगदानाच्या महान कार्याच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय आणि परभणी आकाशवाणी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.