ग्रंथ विक्री प्रदर्शनास दिल्लीकर मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद
नवी दिल्ली, दि २५ (आजचा साक्षीदार) : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित ग्रंथ विक्री प्रदर्शनास दिल्लीकर मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असल्याची प्रतिक्रिया सहभागी प्रकाशकांनी दिली.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अतंर्गत कस्तुरबा गांधी मार्गस्थित सदनमध्ये ग्रंथ विक्री प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. या तीन दिवसीय ग्रंथ विक्री प्रदर्शनास दिल्लीकर मराठी भाषिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याची प्रतिक्रिया प्रकाशकांनी व्यक्त केली.
या ग्रंथ प्रदर्शनास दिल्लीतील मराठी लोकांनी, येथील मराठी साहित्यिकांनी, प्रतिनियुक्तीवर असणारे महाराष्ट्र कॅडरचे अधिकाऱ्यांनी, इतर केंद्रीय मंत्रालयातील मराठी भाषिक अधिकाऱ्यांनी, पत्रकार, खासदार, माजी खासदार, सदनातील निवासी पाहुण्यांनी भेट देऊन विविध विषयांवरील पुस्तकांची खरेदी केली.
या ग्रंथ प्रदर्शनात पॉप्युलर प्रकाशन, संस्कृती प्रकाशन आणि रसिक प्रकाशनाची दालने होती. साहित्य, संस्कृती, अर्थविषयक, राजकीय, ऐतिहासिक, वैचारिक अशा विविध विषयांवर आधारित सुप्रसिद्ध लेखकांसह, नवोदित लेखकांची पुस्तके मांडण्यात आली होती.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज महाराष्ट्रातील कवी त्यांच्या स्वरचित रचनेचे काव्य वाचन करतात. महाराष्ट्र सदन येथे दर्शनिय ठिकाणी मराठीमध्ये़ सुविचार लिहीले जात आहे. यासह उर्वरित दिवसांमध्ये लघुपट, मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्याने, वकृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत.
मराठी भाषा विभागाच्या शासन निणर्यानुसार दिनांक १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे आयोजन राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये करण्यात येते.