ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय
संभाजीनगर, (आजचा साक्षीदार), दि. 09 जानेवारी २०२३ : ग्रामीण भागातील निराधार, शेतकरी, महिला आणि बेघरांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबविले. या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी पैठण दौऱ्या दरम्यान दिले. पैठण तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागाच्या कक्षात भेट देऊन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी पाण्डेय आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी घेतला. पैठणचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार शंकर लाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.देसले, गटविकास अधिकारी डॉ.ओमप्रकाश रामावत यांच्यासह तहसील आणि पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती .
पैठण तहसील कार्यालयाच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजनेसह “थोडेसे मायबापासाठी” या उपक्रमाला गती देण्यास सांगितले. निराधार, गरजू, वृद्ध ,विधवा आणि अपंगांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यातील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन ग्रामीण भागात सर्वेक्षण करावे, सर्वेक्षणातून अधिकाधिक लाभार्थ्याची निवड करता येईल, यामुळे गरजूंना आर्थिक लाभ मिळेल. तालुक्यातील शिधापत्रिका आधार संलग्निकीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच पुरवठा विभागाने तालुक्याचा लक्षांकाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. (महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन उपक्रम)
पैठण तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याबाबतही त्यांनी सूचित केले. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याबाबतची मंडल निहाय माहिती त्यांनी घेतली. तहसील मधील अनुकंपा तत्त्वावरील वरील कर्मचा-यांची नियुक्ती, अभिलेख कक्ष, सेतू सुविधामार्फत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणाऱ्या सुविधांविषयी व यातील त्रुटी आणि प्रलंबित अर्जाचा आढावा घेऊन जलद सेवा आणि विविध प्रमाणपत्र मुदतीत देण्याचे तहसीलदार यांना सूचित केले.
पंचायत समिती पैठण कार्यालय आढावा औरंगाबाद – पैठण रोडच्या दोन्ही बाजूने असलेला कचरा त्वरीत हटवण्याबाबतची सूचना नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिली. पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना व अपूर्ण असलेले घरे पूर्ण करण्यासाठी जागेची उपलब्धता, लाभार्थ्याची निवड, त्यांचे स्थलांतर आणि इतर त्रूटी दूर करून बेघर असणा-यांना घर उपलब्ध करून लाभ देण्यास सांगितले . कृषी विभाग आणि आरोग्य विभागाच्या कक्षास भेट देऊन शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम पंचायत समितीने हाती घ्यावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.
संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात दर्शन घेऊन संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आढावा जिल्हाधिकारी पाण्डेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मीना यांनी घेतला. यानंतर संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू करण्यासाठी आवश्यक असण्याऱ्या सुविधा बाबत जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून माहिती घेतली. (महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन उपक्रम)