अहमदनगर, 8 ऑगस्ट (सौजन्य – जिमाका वृत्तसेवा) – स्वातंत्र्याचा #अमृत महोत्सवा निमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात ”#घरोघरीतिरंगा” हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी व उपक्रमाच्या आयोजना संदर्भात जिल्ह्यातील खासदार, आमदार, सरपंच आदी लोकप्रतिनिधींचे विचार व सुचना जाणून घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात या उपक्रमासंदर्भात आज दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार डॉ. किरण लहामटे, हे दुरदृष्यप्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, जिल्ह्यातील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीत ”घरोघरी तिरंगा” हा उपक्रम जिल्ह्यात पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सोबत चर्चा केली.
या बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ”घरोघरी तिरंगा” उपक्रमात ग्रामीण भागातील नागरीकांना तिरंगा ध्वज मोफत देण्यासंदर्भात नियोजन समितीच्या माध्यमातुन किंवा खासदार, आमदार यांच्या निधीतुन काही निधी उपलब्ध होऊ शकतो का याबाबत विचार करावा अशी सुचना केली. तसेच आमदार प्रा. राम शिंदे यांनी या उपक्रम काळात नागरीकांनी भारतीय ध्वज संहितेचे पालन काळजीपूर्वक करण्यासाठी प्रशासनाने नागरीकांना तिरंगा लावण्यासंदर्भात मार्गदर्शन सुचना कराव्यात व याबाबत जनतेमध्ये जागृती करावी. राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही याची विशेषतः काळजी नागरीकांना घेण्याबाबत सांगावे, असे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. किरण लहामटे यावेळी म्हणाले, ग्रामीण भागातील नागरीकांना सुध्दा ध्वज संहितेच्या पालनासंदर्भात ध्वज वाटप करतांना ध्वज संहिता पाळण्याबाबत मार्गदर्शक सुचनांचे पत्रक वाटप करावे. त्यामुळे नागरीक आपल्या घरावर तिरंगा योग्य पध्दतीने उभारू शकतील यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले, यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काही सरपंचाशी संवाद साधला व उपक्रमाबाबत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणा-या कार्यक्रमांची माहिती जाणुन घेतली. गट विकास अधिकारी यांच्याशी दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधतांना डॉ. भोसले म्हणाले, तालुक्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासत घेऊन हा उपक्रम तालुका स्तरावर टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करोवत. उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. तालुक्यातील प्रत्येक घरावर ध्वज उभारला जाईल यासाठी सर्वांनी जनजागृती करावी. जनजागृतीसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम, प्रभात फेरी, विविध स्पर्धा, ग्रामसभा यांचे आयोजन करावे. अशा सूचना त्यांनी यावेळी गटविकास अधिका-यांना दुरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिल्यात.