अलिबाग,दि.06 : – “किमान आधारभूत किंमत खरेदी योजना” ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते. हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना लाभ मिळावा, या हेतूने राज्यात खरेदी केंद्र सुरु केली आहेत.
रायगड जिल्ह्यात पणन हंगाम 2020-21 मध्ये 40 खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली होती. या खरेदी केंद्रावर 25 हजार 34 शेतकऱ्यांकडून 4 लाख 10 हजार 756 क्विंटल इतके धान खरेदी झाले होते. तर पणन हंगाम 2021-2022 मध्ये 38 धान खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली होती. पणन हंगाम 2021-2022 मध्ये 25 हजार 832 शेतकऱ्यांकडून 5 लाख 49 हजार 279.64 क्विंटल इतकी धान खरेदी झालेली आहे.
शासनाने पणन हंगाम 2020-2021 व पणन हंगाम 2021-2022 मध्ये खालीलप्रमाणे आधारभूत किंमत (हमी भाव) ठरवून दिली होती.
पिक- धान/भात, दर्जा- साधारण, हंगाम 2020-21- आधारभूत किंमत- रु.1 हजार 868, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर- रु.1 हजार 868
पिक- धान/भात, दर्जा- साधारण, हंगाम 2021-22- आधारभूत किंमत- रु.1 हजार 940, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर- रु.1 हजार 940
पिक- धान/भात, दर्जा- अ, हंगाम 2020-21- आधारभूत किंमत- रु.1 हजार 888, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर- रु.1 हजार 888
पिक- धान/भात, दर्जा- अ, हंगाम 2021-22- आधारभूत किंमत- रु.1 हजार 960, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर- रु.1 हजार 960
कृषी विभागाने पणन हंगाम 2020-2021 मध्ये एकरी 10 क्विंटल उत्पादक क्षमता कळविली होती व त्यानुसार या हंगामात धान खरेदी करण्यात आली होती तर पणन हंगाम 2021-2022 मध्ये 12.50 क्विंटल धान खरेदीची उत्पादक मर्यादा कळविल्यानुसार धान खरेदी करण्यात आल्याने धानाची खरेदी वाढली आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सन 2021-2022 मध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची प्रति एकरी उत्पादक क्षमता वाढविल्याने व खरेदी केंद्रावर धान खरेदीचा ओघ वाढल्याने अधिकच्या धान साठवणुकीसाठी शासनातर्फे यापूर्वी असलेली वडखळ, नेरळ, कर्जत या गोदामाव्यतिरिक्त महाड, ता.महाड व मेढा ता.रोहा या ठिकाणी खरेदी केलेले अधिकचे धान्य साठवणुकीसाठी तातडीने गोदामे उपलब्ध करुन दिली.
जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने रायगड जिल्हयात एकूण 25 हजार 832 शेतकऱ्यांकडून 5 लाख 49 हजार 279.64 क्विंटल इतकी धान खरेदी झालेली आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना शेतीकरिता चालना मिळाली असून शेतीला लाभ झाला आहे. औद्योगिक क्षेत्र वाढले असूनसुध्दा शेतकऱ्यांचा शेतीकडे कल वाढत आहे. चालू वर्ष पणन हंगाम 2022-23 करिता शासनाचे आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या आदेशान्वये धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येतील.
जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पणन अधिकारी श्री.केशव ताटे यांनी वेळोवेळी धान खरेदी केंद्र व धान भरडाई मिलर्स यांना भेटी देऊन धान खरेदीमध्ये सुसूत्रता आणली व धान खरेदी वाढविण्यास सहकार्य केले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली आहे.