जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
जालना, दि. 2 जानेवारी 2023 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवासाठी जिल्हास्तरीय संघ निवडण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या वतीने 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींकरिता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य कलाप्रकारात 20 कलाकारांची संख्या असेल व वेळ 15 मिनिटे राहील. लोकगीत कलाप्रकारामध्ये कलाकारांची संख्या 10 असेल व वेळ 7 मिनिटे राहील. जिल्ह्यातील प्रतिभावंत कलाकार यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी संगीत विद्यालय, महाविद्यालये, सांस्कृतिक मंडळे, युवक मंडळे, नामाकिंत कलाकार, संस्था यांनी कार्यालयीन वेळेत क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे 7588169493 यांच्याशी संपर्क साधावा. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ,कलावंतानी आपले प्रवेश अर्ज विहित नमुन्यात भरून स्पर्धा स्थळी उपस्थित रहावे.
स्पर्धांसाठी कलाकाराचे, सहकलाकार, साथसंगत देणारे यांचे वय 15 ते 29 असा राहील, दि. 12 जानेवारी 2023 रोजी किमान वय 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 वर्ष असावे. दि. 12 जानेवारी 2008 पुर्वीचा दि. 12 जानेवारी 1994 नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत जन्म तारखेचा पुरावा आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होऊ शकणार नाही.
लोकनृत्य- सर्व संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक असून विहित 20 कलाकारांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. अंतिम निकाल हा ताल, नृत्य दिग्दर्शन, पोशाख, मेकअप, संच, एकत्रीत परिणाम याबाबीवरून काढण्यात येईल. लोकनृत्य पुर्वध्वनीमुद्रीत टेप, कॅसेट, सिडी अथवा पेनड्राईव्ह ला परवानगी दिली जाणार नाही. लोकनृत्याचे गीत चित्रपट बाह्य असावे तसेच लोकगीतामध्ये फिल्मी गीत गाण्यास परवानगी दिली जाणार नाही. एखादी स्पर्धा सुरू असतांना विद्युत पुरवठा बंद झाल्यास स्पर्धा आहे त्या परिस्थितीत चालू ठेवावयाची किंवा सुरूवातीपासून घ्यावयाची या बाबतचा निर्णय आयोजन समितीचा अंतिम राहिल. युवा महोत्सवातील कला प्रकारात सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना परिक्षकांचा निर्णय अंतिम मानावा लागेल. परिक्षकांबाबत कुठलाही आक्षेप घेता येणार नाही. प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यासह रूपये 500/- भरून त्याच ठिकाणी आक्षेप सिध्द करावा लागेल.
संयोजकामार्फत विद्युत पुरवठा व रंगमंचाची व्यवस्था करण्यात येईल. बाकी सर्व आवश्यक साहित्य त्या त्या स्पर्धकांनी सोबत आणावे लागेल. एखादी स्पर्धा त्या स्पर्धाच्या संकल्पनेनुसार सादर होत नसल्यास ती स्पर्धा थांबविण्याचे अधिकार संयोजक समितीचे राहतील युवा महोत्सवातील संख्या ही साथ – संगत देण्यासह असल्यामुळे वेगळे साथ- संगत घेता येणार नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावा. प्रवास, निवास, भोजन सर्व स्पर्धकांनी स्वत:करावा लागेल, असे जिल्हा क्रिडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.