जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याची इसापूर रमना येथे जनजागृती
हिंगोली दि. २६ (आजचा साक्षीदार): येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने दि. 20 जानेवारी, 2023 रोजी हिंगोली तालुक्यातील इसापूर रमना येथे जि.प.मा.शाळेमध्ये आयोजित राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीरामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाह निर्मुलन या विषयावर सविस्तर माहिती दिली. यामध्ये बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहे. या सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
तसेच मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे सांगितले. कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी बाल विवाहाचे दुष्परिणामाबाबत माहिती दिली. समुपदेशक सचिन पठाडे यांनी महाराष्ट्रातील बाल विवाहाचे प्रमाण आणि जिल्ह्याची स्थिती या बाबत पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बाल विवाह प्रतिबंध या विषयावर पथ नाट्य सादर केले.
जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक 1098 किंवा पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 यावर माहिती देण्याबाबत उपस्थित गावकऱ्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी सर्व उपस्थितांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ देण्यात आली. या कार्यक्रमासाठी बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संगीता मुंडे, प्रा.डॉ.सुनिल कांबळे, प्रा.डॉ.मनिषा गवळी, कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बळीराम शिंदे, प्रा. संजय चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.