जिल्ह्यातील प्रत्येक गावात आज कोविड-19 लसीकरणाची विशेष मोहिम… शासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी लसीकरणासाठी आपआपल्या गावी…
नांदेड जिल्ह्यात अनेक नागरिकांनी कोविड-19 च्या लसीकरणाबाबत अनस्था दाखवून लस घेण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले आहे. कोविड-19 चा धोका अजूनही तसूभरही कमी झाला नसून संभाव्य धोक्यापासून बचावासाठी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
जिल्हा प्रशासनात अनेक अधिकारी व कर्मचारी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून समाजाप्रती व आपल्या गावाप्रती उत्तरदायीत्व म्हणून याचबरोबर राष्ट्रसेवेचा एक भाग म्हणून आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी आपआपल्या गावात लसीकरण साक्षरतेसाठी व लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी गावात हजर राहणार आहेत.
नांदेड जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिक या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरण करुन घेऊन आपले कर्तव्य बजावतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या शासकीय सेवेसमवेत ज्या गावात आपण जन्मलो त्या गावाची सेवा करण्याची संधी या अभिनव उपक्रमाद्वारे उपलब्ध झाल्याने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
लसीकरणाच्या मोहिमेसाठी आपले योगदान देतांना आम्हाला अधिक आनंद असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली. पोटनिवडणूक असलेली गावे वगळून जिल्ह्यातील प्रत्येक गाव उद्या या लसीकरणाची अनुभूती घेणार आहे.