जिल्ह्यात 30 जानेवारी पासून कुष्ठरोग जनजागृती अभियान
वर्धा, दि. १९ जानेवारी (आजचा साक्षीदार) : समाजामध्ये कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करुन जाणीव जागृती करण्यासाठी जिल्ह्यात दि.30 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या तयारीचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आढावा घेतला.
बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. लक्षदिप पारेकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण वेदपाठक, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण धमाने, जिल्हा हिवताप अधिकारी जयश्री थोटे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अन्नपूर्णा ढोबळे, आशा समन्वयक दिपाली चांडोळे उपस्थित होते.
कुष्ठरोगाबाबत समाजात असलेला दृष्टीकोण बदलण्यासोबतच या रोगाची लक्षणे, चिन्हे, उपचार अभियान काळात लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. लक्षणे असलेले परंतु अद्यापपर्यंत निदान न झालेल्या संशयीत कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यात येणार आहे. दि.26 जानेवारी रोजी ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सामान्य रुग्णालयांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, अंगणवाडी येथे कुष्ठरोग जनजागृतीबाबत प्रतिज्ञा देण्यात येणार आहे.
दि.30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग निवारण पंधरवाडा साजरा केला जातो. या दरम्यानच हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. अभियानादरम्यान दि. 30 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात येईल. अंगणवाडी सेविका व मदतनिसमार्फत जिल्हाभर घरोघरी संशयीत कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन जवळच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येईल. कुष्ठरोग बाधित रुग्णांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
अभियान दरम्यान निबंध स्पर्धा, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सभा, आरोग्य मेळावे, प्रश्न मंजुषा, त्वचारोग शिबिर, महिला मंडळ मेळावा, जनजागृती दौड, पथनाट्य, कविता वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.