दुर्गम भागातील वीज वितरण योजनांना गती द्या – जिल्हाधिकारी
गडचिरोली दि.28 : दुर्गम भागात महावितरणअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना वनविभागाच्या समन्वयाने गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी दिले. विज वितरण क्षेत्र सुधारणा ही योजना केंद्र शासनाने सुरु केलेली असुन या योजनेअंतर्गत अंतर्भुत कामांसाठी वनविभागाच्या आवश्यक परवानगीकरीता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाशी समन्वय साधुन आवश्यक ते प्रस्ताव सादर करावे, तसेच वनविभागाच्या प्रस्तावासोबत आवश्यक असलेल्या ग्रामपंचायत ठरावाकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद स्तरावरुन पाठपुरावा करण्याचे सूचना महावितरण, वनविभाग व जिल्हा परिषद प्रशासनाला त्यांनी दिल्या.

महावितरण अंतर्गत विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस महावितरण चे मुख्य अभियंता हरिष गजबे, उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, महावितरणचे अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता संजय डोंगरवार, कार्यकारी अभियंता(प्रशासन) सचिन कोहाड, उपकार्यकारी अभियंता(स्था.) प्रतिक भिवगडे, तसेच कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे (आल्लापल्ली) तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.