नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | जिथे घरांना दारं नाहीत | शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर
देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण दारे नाहीत, झाड आहे पण सावली नाही… ही आगळी-वेगळी वैशिष्ट्ये असलेले शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. उघड्या चौथऱ्यावर पाच फूट नऊ इंच उंचीची दगडी शिळा असून तेथे अखंड तेलाचा अभिषेक केला जातो.
गावातील कोणत्याही घराला दारे नाहीत आणि कपाटांना कुलपे नाही. येथे चोऱ्या होत नाहीत, चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे डोळे जातात, अशी लोकांची श्रद्धा आहे. शनि अमावास्येला येथे मोठी यात्रा भरते. सुमारे ५ ते ७ लाख भाविक या दिवशी शनिशिंगणापूरला जमतात. अमावास्येच्या मध्यरात्री शनीची विधिवत पूजा केली केली जाते.
नेवासे तालुक्यात सोनईजवळ असलेले हे स्थळ नगरपासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे. शनिशिंगणापूरला जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील घोडेगावपासून तसेच नगर-मनमाड रस्त्यावरील राहुरीजवळून फाटा आहे. बेल्हेकरवाडीचे रेणुका मंदिर : – सोनईपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेली बेल्हेकरवाडी तेथील रंगीत काचांनी मढविलेल्या रेणुका मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हंसतीर्थ महाराजांची तपोभूमी असलेल्या या ठिकाणी रेणुकामातेच्या तांदळ्याची प्रतिष्ठापना कृष्णानंद स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अण्णा महाराजांनी केली.
अंतर : अहमनगरपासून ३८ किलोमीटर, शिर्डीपासून ८० किलोमीटर