नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

यवतमाळ : जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील १० दिवस तापमान आणखी वाढ होऊन ते ४५ अंश डिग्री सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या काळात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये,याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ४ या वेळात घराबाहेर पडणे टाळवे. थोड्या- थोड्या अंतराने पाणी प्यावे, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे, घराबाहेर पडताना टोपी,गमछा, दुपट्टा डोके व तोंड झाकण्यासाठी वापरावा, छत्रीचा वापर करावा व सोबत पाणी ठेवावे.

मद्य,चहा,कॉफी व कार्बोनेटेड शितपेय पिण्याचे टाळावे. तसेच शिळे अन्न खाणे टाळवे. उन्हात काम करताना चेहरा व डोके पांढ-या कपड्याने झाकावे. चक्कर येत असल्यास व आजारी वाटल्यास लवकरात लवकर डॉक्टराकडे जावे. तत्पूर्वी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी सेवन करावे.

घरामध्ये लहान मुलं असल्यास त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. दुपारी १२ ते ४ या वेळेत मुले बाहेर पडणार नाहीत,याची काळजी घ्यावी. दिवसभर पुरेसे पाणी पीत राहतील याकडे लक्ष द्यावे.

उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवावे. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे. ओल्या कपड्याने त्यांना पुसत राहवे. डोक्यावर थंड पाणी टाकावे. ओआरएस,लस्सी,ताक,लिंबूपाणी द्यावे,तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात त्वरीत दाखल करून उपचार सूरु करावे. सोबतच पाळीव प्राण्यांना सुद्धा सावलीत ठेवून भरपूर पाणी प्यायला द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *