0 0
Read Time:5 Minute, 29 Second

आज करोना संबधी निळू फुले (Nilu Phule) यांचा फोटो वापरून एक पोस्ट फिरत होती.  पूर्वी ‘ करो ना ‘ म्हटलं की आनंद व्हायचा,  आता करोना म्हटलं की भिती वाटते…इति!

निळू भाऊंना महाराष्ट्र एवढ्याच साठी ओळखतो ? 

आजही निळू फुले (Nilu Phule)  यांच्या आवाजाची नक्कल करून  ‘ बाई वाड्यावर या! ‘ असा संदेश जाहिरात कंपनीकडून दिला जातो. बाई,  वाडा आणि निळू फुले हे समीकरण महाराष्ट्राने रूढ करून निळू भाऊंची यथेच्छ बदनामी चालविली आहे. बरं… त्या विषयी कोणालाच काही देणंघेणं नाही,  अशी आजची अवस्था आहे  .
निळू फुले (Nilu Phule)  हे उत्तम चरित्र अभिनेते होते . त्यांनी मराठी चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या.  त्या वेळचा रंगेल पाटील,  सरपंच,  चेअरमन त्यांनी रंगवला.  त्या भूमिका महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्त्वाचे इरसाल नमुने होते.  त्या चित्रपट रसिकांनी स्वीकारल्या.  पण निळू फुले म्हणजे काय पाटील,  सरपंच रंगविणारे अभिनेते नव्हते.  सिंहासन चित्रपटातील त्यांची पत्रकार दिगू टिपणीसची भूमिका आठवली म्हणजे आजही अंगावर काटा येतो.  चित्रपटाच्या अखेरीला संवेदनाक्षम दिगू वेडा होते,  हे आपल्या समाजाचे,  सत्तास्पर्धेचे नाटय चित्रपटात मांडले आहे.  पण निळू फुले यांच्या अशा भूमिका आपण लक्षात न ठेवता ‘ बाई वाड्यावर या  ‘ ही टॅग लाईन तेवढी लक्षात ठेवतो. 
निळू फुले (Nilu Phule)  यांचा पिंड नटाचा आणि समाजवादी कार्यकर्त्याचा होता.  त्यांनी प्रारंभी सेवादलाच्या कलापथकातून भूमिका केल्या. पुढारी पाहिजे,  बिन बियाचे झाड अशा नाट्य संहितातून ते फुलले.  पुढे कथा अकलेच्या कांद्याची या फार्स असणा-या नाटकातून त्यांचे नाव झाले. ‘ एक गाव बारा भानगडी ‘ या चित्रपटातील त्यांची झेले अण्णाची भूमिका गाजली.  त्यांनी शंभरहून अधिक मराठी चित्रपट केले आणि निवडक हिंदी चित्रपटात ते दिसले.  तरी नाटकाचे प्रेम कायम राहिले.  सखाराम बांईडर हे तेंडुलकरांचे नाटक रंगभूमीवर वादळी ठरले आणि सखारामची निळू फुले यांनी केलेली भूमिका तेवढीच दमदार ठरली.  सामना या चित्रपटातील त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची होती.  पण आपण अशा अनवट भूमिका विसरून  ‘ बाई वाड्यावर या ‘ पुरतेच त्यांना मर्यादित करून ठेवले. 
निळू फुले (Nilu Phule) हे संवेदनशील व्यक्ती होते.  मानधनाच्या पाकीटातले गरजेपुरते पैसे ठेऊन घेऊन उरलेले पाकीट एखाद्या कार्यकर्त्याला देणारे भाऊ अनेकांनी अनुभवले आहेत . महाराष्ट्रातील वैचारिक आणि प्रबोधनाच्या चळवळी विषयीचे दांडगे वाचन त्यांचे होते.  माझ्या संशोधन विषयासंबंधीची पुस्तके मला त्यांच्याकडून मिळालेली होती.  प्रगल्भ सामाजिक भान असणा-या निळू फुले यांनी सामाजिक कृतज्ञता निधीसाठी लग्नाची बेडी हे नाटक रंगभूमीवर सादर करून मोठा निधी उभा केला होता  . त्यासाठी ते लोकांपर्यंत पोहचले होते.  सामाजिक प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची त्यांची तयारी होती  . तारांकित यश डोक्यात न गेलेला हा अभिनेता अनेकांचा आधारवड होता.  
तरी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या खलनायकी भूमिकाच लक्षात ठेऊन आपल्या हीन अभिरूचीचे प्रदर्शन करतात याचे वाईट वाटते  .  निळू फुले यांची आज जयंती नाही की पुण्यतिथी नाही.  तरी अनेक दिवस ‘ बाई वाड्यावर या  ‘ या संवादातून आपण त्यांच्यावर अन्याय करतो असे वाटत रहाते.  महाराष्ट्र संस्कृतीला ते घातक आहे आणि विचार परंपरेलाही.  
डाॅ शंकर बो-हाडे 
९२२६५७३७९१
shankarborhade@gmail.com
(डॉ.शंकर बोऱ्हाडे यांच्या भिंती वरून साभार…)
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *