वाशिम, दि. 30 : सन 2022-23 या वर्षात केंद्र शासनाने तुर, मसुर व उडीद पिकाची क्षेत्र उत्पादन व उत्पादकता वाढीकरीता संपूर्ण देशामध्ये 370 जिल्हयाची निवड केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात तुर पिकाची उत्पादकता वाढ करण्याच्या दृष्टिने कमी उत्पादकता असलेल्या 16 जिल्हयाचा समावेश करण्यात आला आहे. याकरीता अधिकारी/कर्मचारी यांची कार्यशाळा घेऊन तुर पिकाच्या उत्पादकता वाढविण्याकरीता मानक कार्यरत प्रणाली निश्चित करून त्याचा अवलंब करण्याकरीता रोडमॅप तयार करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी आत्मा सभागृह येथे अधिकारी/कर्मचारी यांची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यशाळा घेण्याचा उद्देश प्रास्ताविकातून तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ यांनी सविस्तरपणे विषद केला. तुर पिकाबाबत प्रादेशिक कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत यांनी मार्गदर्शन केले. तूर पिकावरील किड व रोगाबाबत कृषी विज्ञान केंद्र, करडाचे किटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी माहिती दिली. कार्यशाळेकरीता जिल्हयातील सर्व तालुका कृषि अधिकारी, सर्व मंडळ कृषि अधिकारी, सर्व कृषि पर्यवेक्षक व सर्व कृषि सहायक आणि प्रगतशिल शेतकरी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेकरीता फलोत्पादनचे तंत्र अधिकारी श्री. धनडे कु. लंगोटे, प्रदीप थोरात, संध्या राऊत यांची उपस्थिती होती. आभार पंकज आरू यांनी मानले.