प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता
वर्धा, दि. १५ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची मोठया प्रमाणावर लागन झाल्याने राज्यात जनावरांचा बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत वाहतुक करणे यावर बंदी घालण्यात आली होती. काही अटी व शर्तीच्या अधीन राहून वाहतुक व बाजारास मान्यता देण्यात आली आहे. मात्र अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यांतर्गत वाहतुक करावयाच्या गुरांचे 28 दिवसांपूर्वी प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग व टॅग नंबर तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. संक्रमीत किंवा संक्रमीत नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतुक करण्यासाठी आवश्यक आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी यांची सक्षम अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी या अधिका-याचे आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
गुरांची वाहतुक करतांना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतुक अधिनियमान्वये स्वास्थ प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील. जिल्ह्या पशुबाजारामध्ये यापुढे टॅगींग व रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय खरेदी विक्री होणार नाही. असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेशात नमुद केले आहे.