कोल्हापूर, दि. 2 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन करण्यात येते. बांधकाम आयुक्त कार्यालयास प्राप्त होणारे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच निकाली काढण्यात येतात याकरीता या कार्यालयाने कोणतीही संघटना/ इतर व्यक्ति वा कोणताही एजंट नेमलेला नाही. मंडळामार्फत मिळणारे सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाव्यतरिक्त अन्य विविध कल्याणकारी योजना बांधकाम कामगारास मोफत मिळतात. त्यासाठी कोणत्याही संघटना / इतर व्यक्ति वा कोणत्याही एजंटाच्या आमिषास जिल्ह्यातील बांधकाम कामगाराने बळी पडू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे.

बांधकाम कामगारांची नोंदणी फी (वार्षिक वर्गणी – २५ रुपये व दरमहा १ रुपये प्रमाणे १२ रुपये अंशदान ) असे एकूण ३७ रुपये नोंदणी व नुतनीकरण फी (दरमहा १ रुपये प्रमाणे वर्षाचे रु. १२ रुपये अंशदान ) असे एकूण रुपये- १२ मध्ये नुतनीकरण होते. तसेच बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र म्हणजेच नियोक्ता दाखला हा कोणत्याही शासकीय विभागातील नोंदणीकृत ( लायसन्स धारक ) नियोक्ता, नोंदणीकृत कंत्राटदार किंवा महानगरपालिका / नगरपालिका पाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याचे / ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. एखाद्या कंत्राटदाराने, नियोक्त्याने अधिकचे दाखले दिले असतील तर त्याचीही माहिती एकत्रित करण्याचे काम कामगार आयुक्त कार्यालयमार्फत सुरू आहे, असेही कामगार आयुक्त कार्यालयामर्फत कळविण्यात आले आहे.