बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.
एका कुटुंबातील दोन बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. अर्ज केल्यानंतर मा.बाल कल्याण समितीच्या आदेशाने जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत सदरील बालकाची सामाजिक तपासणी अहवाल तयार करण्यात येतो. तो अहवाल मा.बाल कल्याण समितीस सादर केल्यानंतर कुटुंबाच्या सर्वांगीण परिस्थितीचा विचार करुन बाल कल्याण समितीच्या आदेशाने संबंधित लाभार्थ्यास बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. बाल संगोपन योजना ही महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी विनाशुल्क राबविली जाते. या योजनेसाठी महिला व बालविकास विभागाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन कोणत्याही मध्यस्थी व्यक्तीद्वारे न देता स्वत: बालक व पालकांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली एस-7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नांदेड रोड, हिंगोली येथे अर्ज करावा किंवा संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.