स्वातंत्र्यपूर्व काळात लोखंडी पत्र्यापासून बनवलेला ब्रिटिशांचा भारतातील सर्वात मोठा ‘युनियन जॅक’ अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर फडकत असे. त्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतातील सर्वात मोठ्या तिरंग्यांपैकी एक मानाचा तिरंगा भुईकोट किल्ल्यावर फडकवला गेला. त्यानंतर १९५३ साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी भुईकोट किल्ल्यावर ध्वजारोहण केले.
असे ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या भुईकोट किल्ल्याच्या परिसरात, फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या (Flag Foundation Of India) वतीने आर्मड कोअर सेंटर अँड स्कुल तसेच अहमदनगरकरांना एक उत्तुंग ध्वजस्तंभ समर्पित करण्यात आला आहे.
जणू या गगनस्पर्शी ध्वजस्तंभावर अभिमानाने फडकणारा हा भारतीय तिरंगा, नगरच्या जाज्वल्य इतिहासाला प्रत्येक क्षणी उजाळाच देत असतो.