मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक - मान्यवरांचे सूरमराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक - मान्यवरांचे सूर

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक – मान्यवरांचे सूर

अकोला,दि.१६ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – मराठी भाषा ही आपली मायबोली भाषा असून अनेक बोलीभाषेने ती समृद्ध झाली आहे. मराठी भाषा केवळ एक संवादाचे माध्यम नसून आपल्या वागण्या, बोलण्यातून आपले व्यक्तिमत्वच नव्हे तर आपली संस्कृतीचा परिचय देतो. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या मातृभाषेविषयी अभिमान बाळगून ती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा, असा सूर सर्व मान्यवरांनी आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालय व शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचे’ शुभारंभ महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, मराठी विभागाचे डॉ. सुलभा खर्चे, इंग्रजी विभागाचे डॉ. विवेक हिवरे, मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य श्याम ठक, डॉ. विनय दांदळे, मयुर लहाने, महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट म्हणाले, मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. विविध बोलींचा समावेश असलेली ही भाषा समृद्ध झाली आहे. कथा,कादंबरी,काव्य अशा विविध साहित्य प्रकारांनी ही भाषा अधिक व्यापक बनली आहे. या भाषेच्या समृद्धीसाठी महाविद्यालया मार्फत विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्याची माहिती यावेळी दिली.

दैनंदिन आयुष्यात समाजमाध्यमांवरील मराठी भाषेच्या सहज वापराबाबत मार्गदर्शन केले. मराठी भाषा ही आपली मायबोली असून आपल्या भावभावना त्यातून अधिक समर्पकपणे व्यक्त होऊ शकतात. त्यामुळेच मराठी भाषिक असल्याचा अभिमान आपण प्रत्येकाने बाळगावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचे सदस्य पुष्पराज गावंडे म्हणाले की, मराठी भाषेला लिपी असलेली समृद्ध भाषा आहे. त्यांचा वापर नवमाध्यमांमधून केला जावा. तसेच तरुणाईने त्यासाठी मराठी भाषा समाजमाध्यमांवरही समृद्ध करावी. मराठी भाषा हे आयुष्याचा अविभाज्य भाग असून त्यांचे संवर्धन करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे, असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी जिल्हा मराठी समितीव्दारे राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. मराठी भाषेचा प्रशासकीय वापरात सक्तीचे असून प्रत्येकांनी आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करावा. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी सहकार्य आवश्यक असून त्यांचा प्रचार -प्रसारात प्रत्येकांने योगदान देण्याचे आवाहन यावेळी केले.

मराठी भाषा संवर्धनसाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात आपलेही योगदान देणे आवश्यक असून दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त मायबोली भाषेचा वापर करावा. तसेच दैनंदिन व व्यावसायिक जीवनामध्ये मराठी भाषेच्या वापर करावा. यामुळे भाषा संवर्धनासह मराठी भाषेतील रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. त्यामुळे सगळ्यांनी अभिमानाने मराठी बोला, वाचा आणि लिहा, असा संदेश मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य श्याम ठक, डॉ. विनय दांदळे व मयुर लहाने यांनी आपल्या संबोधनात दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाचे डॉ. सुलभा खर्चे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन शताब्दी धांडे यांनी तर गणेश मेनकार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *