महात्मा फुले जन आरोग्य योजना साईबाबा रूग्णालयांतील रूग्णांसाठी ‘जीवनदायी’
पाच वर्षात १८ हजार रूग्णांवर उपचार ; १०९ कोटी ४८ लाख विमा रक्कमेची प्रतिपूर्ती !
येथील श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था या संस्थानच्या श्री.साईबाबा हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना ‘जीवनदायी’ ठरली आहे. या योजनेत २०१७ ते २०२२ या मागील पाच वर्षात १८ हजार ८२३ रूग्णांवर उपचार करण्यात आले. या उपचारांच्या खर्चापोटी शासनाकडून रूग्णालयास १०९ कोटी ४८ लाख ४२ हजार रूपयांच्या विमा रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. अशी माहिती रूग्णालयाचे प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी दिली आहे.
तळागाळातील श्रमजीवी असो वा, मध्यमवर्गीय कुटुंबीय असो, आरोग्यविषयक प्रश्न उद्भवल्यास खर्चाचा प्रश्न उभा राहतो. अनेक आजारांवरील औषधोपचाराचा खर्च प्रचंड आहे. दिवसागणिक होणाऱ्या खर्चाचे आकडे हजार ते लाखाच्या घरात पोहोचतात. अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेरील तो खर्च आहे. ही बाब लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१३ पासून राज्यशासनाने ‘राजीव गांधी योजना’सुरू केली. २०२० या योजनेचे ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ असे नामांतर करत ती नव्याने कार्यान्वित करण्यात आली.
विमा कंपनीकडून उपचाराचे पूर्ण देयक मिळत असल्याने रुग्णालयांना नातेवाईकांकडून एकही रुपया घेता येत नाही. त्यामुळे ही योजना श्री.साईबाबा रूग्णालयात येणाऱ्या आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी वरदान व जीवनदायी ठरत आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रतिवर्षी विम्याचा हप्ता शासन मार्फत अदा केला जातो. तसेच प्रतिवर्षी दीड लाख रुपयांची हमी दिली जात आहे. या योजने अंतर्गत बाराशे आजारांवर उपचार केले जातात. १२७ सेवांची फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येतो व ३१ विशेष सेवांचा समावेश करण्यात येतो आणि रूग्णांना सर्व सेवा नि:शुल्क दिल्या जातात. विमा रक्कमेच्या मर्यादेत कुटूंबातील सर्व व्यक्तींना याचा लाभ घेता येतो.
या योजनेत श्री.साईबाबा रूग्णालयांत २०१७-१८ या वर्षात ४५६७ रूग्णांवर उपचारापोटी २९ कोटी २० लाख ४४ हजार ८०३ रूपये, २०१८-१९ या वर्षात ३९३८ रूग्णांवर उपचारापोटी २८ कोटी ८२ लाख ७८ हजार २६६ रूपये, २०१९-२० या वर्षात ४५१४ रूग्णांवर उपचारापोटी २२ कोटी ५७ लाख ७१ हजार ४१५ रूपये, २०२०-२१ या वर्षात २३२९ रूग्णांवर उपचारापोटी १३ कोटी ९९ लाख ८२ हजार ७९८ रूपये व २०२१-२२ या वर्षात ३४७५ रूग्णांवर उपचारापोटी १४ कोटी ८७ लाख ६४ हजार ७५७ रूपयांच्या विमा रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात आली.
‘‘महात्मा फुले योजनेत माझी ह्दयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. खासगी रूग्णालयातील खर्च परवडणारा नव्हता म्हणून साईबाबा रूग्णालयात उपचार घेतले. येथील आरोग्य सुविधा सुसज्ज आहेत. यामुळे मला नवीन जीवन मिळाले.’’ अशी प्रतिक्रिया नाशिक मधील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील रतन रानोबा गायकवाड यांनी दिली आहे.
‘‘महात्मा फुले योजनेत माझी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (valve replacement) शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे आज मी अधिक सुदृढ आयुष्य जगत आहे. गोर-गरीब रूग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना वरदान आहे. अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेलोना येथील शांताबाई प्रकाश कोल्हे यांनी दिली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
- रेशन कार्ड (पिवळे, केशरी, अन्तोदय, अन्नपूर्णा)
- पांढरी रेशनकार्ड व ७/१२ उतारा (शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी)
- ओळखपत्र – (आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक व इतर शासनमान्य ओळखपत्र)
- लहान मुलासाठी (६ वर्ष वयापेक्षा कमी) जन्माचा दाखला, आई किंवा वडिलांचे ओळखपत्र.
- फाटलेले रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड मध्ये त्रुटी असतील तर तहसिलदाराचे प्रमाणपत्र किंवा दुय्यम शिधापत्रिका
विशेष वृत्त सौजन्य – उप माहिती कार्यालय, शिर्डी