महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई दि. १५ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणारे महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठ राज्यात सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, यामुळे ग्रामीण भागातील आणि व्यवसाय करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचा लाभ होईल. तसेच रोजगारासाठी लागणारे कला व कौशल्याचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक केंद्र सुरु करण्यात येईल. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम (LMS) व कॉम्पिटन्सी मॅनेजमेंट सिस्टिम (CMS) चा उपयोग करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात येईल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांला वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आज मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात ऑनलाईन विद्यापीठ समिती (युनिव्हर्सिटी कमिटी) ने अहवाल सादर केला, यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोविड कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतले यामुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडला नाही. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र डिजीटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. हे जगातील दुसरे ऑनलाईन विद्यापीठ असेल. प्रवेश प्रक्रिया, शिक्षणक्रम, परिक्षा, निकाल या सर्वबाबी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होतील. जगातील कोणताही विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेऊ शकेल. विद्यापीठ स्थापनेच्या कायद्याप्रमाणेच या विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी गठित समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले.
दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील ऐतिहासिक दोलामुद्रिते, दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिकांचे संच, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, हस्तलिखिते यांच्या डिजिटायझेशन, जतन, संरक्षण, संवर्धनासंदर्भात आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच, सहकारी सुतगिरण्यांच्या व यंत्रमाग संस्थांच्या अडचणीबाबतही मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आमदार अमरिश पटेल, प्रकाश आवाडे, कुणाल पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे आयुक्त पी. शिव शंकर आदी उपस्थित होते.