महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारीमहाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी

भंडारा दि.१६ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांवर भाविक आणि यात्रेकरू मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. भाविकांची सोय आणि नियोजनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गायमुख यात्रा आणि इतर यात्रांबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, साकोलीच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सिचीन पानझाडे, पोलीस निरीक्षक प्रदिप पुलरवार, कार्यकारी अभियंता जि.प.बांधकाम एम.एफ.परदेशी, उपविभागीय अभियंता सां.बां. उपविभाग तुमसर व्हि.एस.चुरटे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, अशा प्रकारच्या धार्मिक यात्रांमध्ये सर्व वयोगटातील भाविक येत असतात. विशेषत: वृध्द नागरिकांची संख्या जास्त असते, तेव्हा यानिमित्ताने येथील रस्ते, वाहतुक व गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन करावे. पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा तसेच यात्रा परिसरातील हॉटेल, खाद्य पदार्थ आणि प्रसाद स्वच्छ व भेसळ मुक्त असेल याची काळजी घ्यावी. देवस्थानच्या ठिकाणी स्वच्छ पाणी, विद्युत पुरवठा आणि आरोग्य सेवा पुरविण्यासाठी नियोजन करावे, तसेच याबाबत तालुका स्तरावर बैठकाही घ्याव्यात असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

यात्रेच्या काळात देवस्थानाच्या संस्थेने प्रशासना कडून आलेल्या सुचनांचे पालन करणेही अपेक्षित आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे कमी प्रमाणात गर्दी होत होती. मात्र यावेळी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थीत पार पाडाव्यात अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *