दि.08 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज नांदेड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर हिंगोली येथे येताना कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच यापुढे अशाप्रकारे नुकसान पुन्हा होऊ नये याबाबत कायमस्वरूपी उपाय योजना करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी तहसीलदार सुरेखा नांदे यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.