विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. २७(आजचा साक्षीदार) : राज्यात स्कॉलरशिप मिळालेल्या 100 मुलांपैकी 33 मुले कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची बाब अभिमानास्पद आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही हुशार मुले असून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे सांगताना विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन शाळेचे, गावचे, जिल्ह्याचे नाव मोठे करा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
दानोळी येथील धरणग्रस्त वसाहतीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या जीवन शिक्षण विद्यामंदिरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, तहसिलदार अपर्णा मोरे- धुमाळ, गटशिक्षणाधिकारी दीपक कामत, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सरपंच सुनिता वाळकुंजे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यातील गोरगरीब, सामान्य कुटुंबातील मुलांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे, असे सांगून शाळेच्या कंपाऊंडसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, शिक्षणव्यवस्था अधिक बळकट झाली पाहिजे. येथील धरणग्रस्तांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड रुजवण्याबरोबरच आपले व आपल्या परिवाराचे भविष्य उज्वल करण्यासाठीचे दर्जेदार शिक्षण देण्याचे काम इथले शिक्षक करत आहेत. उद्याचा शिक्षण मंत्री, खासदार, आमदार, धरणग्रस्तांच्या मुला-मुलींमधून व्हावा, यासाठीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये व्हावेत.
आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर म्हणाले, अनेक वर्ष धरणग्रस्त बांधव या वसाहतीमध्ये राहतात. धरणामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या हेतूने त्यांनी मोठा त्याग केल्यामुळे धरणे उभी राहिली आहेत. आजही ही वसाहत पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी. धरणग्रस्तांना किमान मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार श्री. यड्रावकर यांनी केले.
प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन जिल्हा परिषद शाळेच्या रौप्य महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
स्वागत सरपंच सुनिता वाळकुंजे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार भिमराव तांबे यांनी मानले.