विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त 31 मेपर्यंत जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली जात आहे. त्या अनुषंगाने हा विशेष लेख…

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन समाजात सर्रासपणे होत असल्याचे दिसते. तंबाखू खाल्ली की काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते, तंबाखू खाल्याशिवाय कामात लक्ष लागत नाही, असे सांगून तंबाखूचे व्यसन करणारे लोक समर्थन करतात आणि तंबाखू व्यसनाला बळी पडतात. त्यातूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण मिळते. व्यसन करताना आपल्या कुटुंबातील आई – वडील, बायको, मुलांचाही विचार केला जात नाही. परंतु कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.

तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचा धोका – तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. तब्बल 80 टक्के मुख कर्करोग हा केवळ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने मौखिक कर्करोग होतो. या कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर त्यावर उपचार करून कर्करोगापासून सुटका होवू शकते. यासाठी मौखिक आरोग्य तपासणी मोहीम जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, प्रा. आ. केंद्र येथे होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले.

तोंड उघडत नसेल, तर घ्या डॉक्टरांचा सल्ला – तंबाखूजन्य पदार्थच्या सेवणामुळे मौखिक कर्करोग होतो. तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंडात पांढरा किंवा लाल चट्टा, तोंडात गाठ होणे, 15 दिवसा पेक्षा जास्त तोंडात जखम होऊन ती लवकर न भरणे यासारखी लक्षणे दिसताच घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे व्यक्त करतात.

सिगारेट, तंबाखूबाबत नियम काय? तंबाखू विरोधी कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करण्यास सक्त मनाई आहे. तसेच 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये. शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस सक्त मनाई आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टनावर 85 टक्के भागात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा वैधनिक इशारा छापणे बंधनकारक आहे. खुली सिगारेट विकण्यास सक्त मनाई आहे.

– जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *