सदानंद मोरे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी….
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वाकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.
डॉ. मोरे यांच्या शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या २९ सदस्यांना पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वाकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी निगडित अध्यक्ष व ३० सदस्य अशा एकूण ३१ सदस्यांची ५ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार डॉ. राजा दीक्षित यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.