सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडेसर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे | पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री. दराडे यांच्याकडून सुमंगल पंचमहाभूत महोत्सव होणाऱ्या जागेची पाहणी

कोल्हापूर, दि. २७(आजचा साक्षीदार) : श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ संस्थान कडून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवात सर्व शासकीय विभागांच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे प्रदर्शन स्टॉल लावावेत. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव तथा पंचमहाभूत महोत्सवाचे नोडल अधिकारी प्रवीण दराडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव पूर्व तयारी आढावा बैठकीत श्री. दराडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मठाचे प्रतिनिधी संतोष पाटील, उदय सामंत, माणिक चुयेकर यांच्यासह मुंबई येथील पर्यावरण विभागाचे अन्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रधान सचिव श्री. दराडे पुढे म्हणाले की, या पंचमहाभूत महोत्सवासाठी कणेरी मठ परिसर व महोत्सवाच्या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा संबंधित विभागांनी त्वरित उपलब्ध करुन देण्यात याव्यात. त्या भागात ग्रामीण रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते दुरुस्ती, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, भाविकांसाठी पाण्याची सुविधा, स्वच्छता, आरोग्य सुविधा याबाबत सर्व संबंधित विभागांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.

कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याकडील शहर वाहतूक बसेसची व्यवस्था महोत्सव कालावधीत किमान दहा दिवस दहा बसेस कणेरी मठ ते कोल्हापूर शहर लोकांचे दररोज ने-आण मोफत करण्यासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. यासाठी आवश्यक असणारा निधी पर्यावरण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याप्रमाणे परिवहन राज्य महामंडळाने त्यांच्याकडेही अशा पद्धतीने राखीव बसेस ठेवाव्यात व प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्या उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी सुचित केले.

या महोत्सवाच्या कालावधीत किमान 20 ते 25 लाख लोक येण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी शासनाच्या किमान 24 विभागाचे विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे मोठे स्टॉल या ठिकाणी दर्शनी भागात लावावेत. या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती आकर्षक फ्लेक्सद्वारा तसेच ऑडिओ जिंगल्स, व्हिडिओच्या माध्यमातूनही लोकांना देण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. दराडे यांनी दिल्या.

महोत्सव कालावधीत मोठ्या संख्येने लोक येणार असल्याने कोल्हापूर शहर तसेच अन्य पर्यटन ठिकाणीही पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत अधिक दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी. आरोग्य यंत्रणाही अलर्ट ठेवावी. महोत्सव परिसरात आपत्तीकालीन यंत्रणाही दक्ष ठेवावी. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते पथक आदी यंत्रणा अलर्ट ठेवाव्यात, अशा सूचना श्री. दराडे यांनी दिल्या.

कणेरी मठ, सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या जागेची पाहणी – पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सुमंगल पंचमहाभूत महोत्सवाच्या अनुषंगाने कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या महोत्सवाच्या जागेची पाहणी तिथे प्रत्यक्ष भेट देऊन केली. यावेळी मठाकडून करण्यात येत असलेल्या विविध कामांची पाहणी श्री. दराडे यांनी केली. श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी महोत्सवाच्या सुरु असलेल्या सर्व कामांची माहिती श्री. दराडे यांना दिली. यावेळी श्री. दराडे यांनी ज्या विभागांची कामे अपूर्ण आहेत ती कामे त्वरित पूर्ण करण्याबाबतचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले.

त्यानंतर दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी पंचगंगा नदी घाटावर महाआरती होणार असल्याने त्या ठिकाणची पाहणी ही श्री. दराडे यांनी केले. यावेळी सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *