साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया
पुणे, दि. १८ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत एक लाख रूपयांची थेटकर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ९० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून लाभार्थ्यांची २३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील सांस्कृतिक सभागृह, विश्रांतवाडी येरवडा, पुणे येथे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली आहे.
चालु आर्थिक वर्षात एकूण ४१ कर्ज प्रस्ताव प्राप्त झाले असून ३२ कर्ज प्रस्ताव पात्र ठरलेले आहेत. मागील आर्थिक वर्षातील २४३ कर्ज प्रस्तावापैकी २३८ कर्ज प्रस्ताव पात्र असून दोन्ही मिळून एकूण २७० कर्ज प्रस्ताव पात्र आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कार्यक्रम होणार आहे.
पात्र अर्जदारांची यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील सांस्कृतिक सभागृह, विश्रांतवाडी येरवडा, पुणे येथील जिल्हा कार्यालयातील सुचना फलकावर लावण्यात आलेली असून पात्र अर्जदारांनी सोडतीच्या दिवशी हजर राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.