सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व प्रकरणे तत्काळ निकाली काढा – सीईओ जिल्हा परिषद
वर्धा दि. १९ जानेवारी (आजचा साक्षीदार) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि त्यांचे निवृत्ती विषयक प्रकरणे तत्काळ निकाली काढा, असे निर्देश सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात श्री.घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पेंशन अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोसले, डॉ. ज्ञानदा फणसे तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ वेळेवर मिळावे पाहिजे. यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.घुगे यांनी दिल्या. सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा सेवानिवृत्ती दिवस आनंदी सेवानिवृत्ती दिवस म्हणुन साजरा करता यावा यासाठी सर्व सेवानिवृत्त प्रकरणे तयार करुन 6 महिण्यांपूर्वीच संबंधित विभागाकडे सादर केल्या जात आहेत. सदर प्रक्रिया पारदर्शक व प्रभाविपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने ऑनलाईन कार्यप्रणालीचा अवलंब करुन व सर्व प्रकरणांचा दरमहा आढावा घेवून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.