सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहनसोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाशिम, दि. 12 : वाशिम जिल्‍हा हा सोयाबीनचे हब म्‍हणुन ओळखला जातो. एकुण खरीप लागवड क्षेत्रापैकी जवळपास ७५ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतल्‍या जाते. त्‍यामुळे जिल्‍हयाचे संपूर्ण अर्थकारण या सोयाबीन पिकावर अवलंबुन आहे. सध्‍याची सोयाबीन पिकाची उत्‍पादकता लक्षात घेता उत्‍पादकता वाढीसाठी फार मोठा वाव आहे. सन २०२२-२३ या वर्षातील जिल्‍हयाची सोयाबीनची सरासरी उत्‍पादकता १३८१ किलो प्रति हेक्‍टर आहे. ती सन २०२३-२४ या वर्षात वाढवुन १९३७ किलो करण्‍याचे उदिष्‍टे कृषि विभागाने निश्‍चीत केले आहे.

नियोजित उत्‍पादकता साध्‍य करण्‍याकरीता काही महत्‍वाच्‍या बाबीकडे शेतकरी बांधवानी लक्ष देऊन त्‍याचा अंगिकार केल्‍यास निश्‍चीत उत्पादन वाढ साध्‍य करता येऊ शकते. यासाठी शेतकरी बांधवांनी पुढील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

जमीन – हलक्‍या जमीनीत हे पिक अपेक्षित उत्‍पादन देऊ शकत नाही. त्‍याकरीता मध्‍यम ते भारी जमीनीवर या पिकाची लागवड करावी.

हवामान व पर्जन्‍यमान – सोयाबिन पिकाच्‍या उगवणीकरीता २५ डिग्री सेल्‍सीअस तापमानाची आवश्‍यकता असुन संपूर्ण वाढीच्‍या अवस्‍थेत सर्वसाधारणपणे २२ ते ३५ डिग्री सेल्‍सीअस तापमानात हे पिक चांगले येते. या पिकाकरीता ७५० ते १००० मी.मी. पावसाची आवश्‍यकता आहे. सुरुवातीच्‍या पिकाचे अवस्‍थेत कमी पाणी लागत असुन दाणे भरण्‍याच्‍या अवस्‍थेत पाण्‍याची जास्‍त आवश्‍यकता असते.

बियाणे व प्रतवारी – सोयाबीन हे पिक स्‍वपरागसिचिंत असून या पिकाची सुधारीत वाण उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे दरवर्षी बाजारातील बियाणे खरेदी न करता तीन वर्षातुन एकदा प्रमाणित बियाणे खरेदी करावे. व प्रमाणित बियाण्‍यापासुन उत्‍पादीत सोयाबीन दोन वर्ष घरगुती पध्‍दतीने साठवुन ठेऊन वापर करता येते. यामुळे बियाण्‍यावर होणाऱ्या खर्चात बचत होण्यास मदत होईल. घरगुती पध्‍दतीने साठवुन ठेवलेल्‍या बियाण्‍याची स्‍थानिक पातळीवर स्‍पायरल सेपरेटरद्वारे प्रतवारी करुन बियाणे म्‍हणुन वापर करता येईल.

उगवणक्षमता तपासणी – घरगुती पध्‍दतीने साठवून ठेवलेल्‍या बियाण्‍याची उगवण क्षमता स्‍थानिक पातळीवर उपलब्‍ध होणारे साहीत्‍य जसे गोणपाठ, टिशु पेपर, वर्तमानपत्राचा कागद किंवा मातीचा ट्रे याचा वापर करुन उगवणक्षमता तपासुन घ्‍यावी. याकरीता पोत्‍यातील बियाणे निवडुन न घेता १०० बिया एका गोणपाटावर १० च्या रांगेत ठेऊन असे चार गोणपाट तयार करावे, ओल्‍या गोणपाटाची गुंडाळी करुन ठेवाव्‍या व ५ ते ७ दिवसानंतर कोंब आलेले बियाणे मोजुन सरासरी टक्‍केवारी काढावी व ७० किंवा 70 टक्क्यापेक्षा टक्‍के पेक्षा जास्‍त उगवणक्षमता आलेले बियाणे पेरणीकरीता वापरावे.

बिजप्रक्रिया – बुरशीनाशक व किटकनाशक – सोयाबीन पिकास प्रथम बुरशीनाशक थायरम ३७.५ + कार्बोझींग ३७.५ टक्‍के ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे लावावे. वेगवेगळया किडी रोगापासुन पिकांचे सुरुवातीच्या काळात संरक्षण करण्‍याकरीता रासायनिक व जैविक बिजप्रक्रिया करणे आवश्‍यक असते. थायोमिथोक्‍झाम ३० टक्‍के एफ एस ३ ते ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्‍यास लावल्‍यास खोडमाशीपासुन संर‍क्षण मिळते तर इमॅडोक्‍लोप्रिड ४८ टक्‍के एफ. एस. मुळे इतर रस शोषण करणाऱ्या किडीपासुन संरक्षण मिळते.

जिवाणु संवर्धन वापर – जमीनीत उपलब्‍ध असणारे विविध अन्‍नद्रव्‍य पिकास उपलब्‍ध होण्‍याकरीता जिवाणुचा महत्‍वाचा सहभाग असतो. याकरीता रायझोबियम + पीएसबी + केएमबी प्रत्‍येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात पेरणीपुर्वी बियाण्‍यास लावावे. बियाण्‍यास प्रथम बुरशीनाशक व नंतर किटकनाशकाची किंवा काही कंपनीचे दोन्‍ही औषधे एकत्रीत असलेले संयोजन बाजारात उपलब्‍ध झालेले आहे ते वापरुन रासायनिक बिजप्रक्रिया करावी. तसेच जैविक बिजप्रक्रिया पेरणीपुर्वी दोन तास अगोदर रायझोबियम + पीएसबी + केएमबी किंवा लिक्‍वीड कॉन्‍सर्सिया वापरुन जैविक‍ बिजप्रक्रिया करावी. रासायनिक बुरशीनाशक उपलब्‍ध न झाल्‍यास प्रथम ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा ६ मी. ली. प्रति किलो बियाण्‍यास बिजप्रक्रिया करावी व नंतर जैविक बिजप्रक्रिया पेरणीपुर्वी दोन तास अगोदर करावी.

जैविक औषधाची बिजप्रक्रिया करणे पेरणीवेळी शक्‍य न झाल्‍यास ट्रायकोडर्मा 5 ते 10 किलो + 100 किलो शेणखत किंवा 2 लिटर ट्रायकोडर्मा + 100 किलो शेणखत मिसळुन सावलीखाली सात दिवस मिश्रणावर पॉलीथिन पेपर झाकावे व सात दिवसानंतर जमीनीमध्‍ये मिसळुन द्यावे. पी.एस.बी. व रायझोबियम 3 ते 5 किलो + 50 किलो शेणखत मिसळुन जमीनीमध्‍ये द्यावे.

योग्‍य वाणाची निवड – शक्‍यतोवर १० वर्षाआतील प्रसारीत वाणाची निवड पेरणीकरीता करावी. कारण जुने झालेले वाणाची किड रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन पिक किड व रोगास बळी पडते. याकरीता आपल्‍या भागात शिफारस केलेले वाण निवडावे. उभट वाढणारी वाण JS ९३-०५, JS ९५-६०, MAUS-१६२ या वाणाचे जमीनीच्‍या मगदुराप्रमाणे २६ ते ३० किलो प्रति एकर बियाणे वापरावे. तसेच फांदया करणारे वाण KDS-७२६, KDS-७५३ व मध्‍यम फांदया करणारे वाण JS-३३५, DS-२२८ व MAUS-६१२, फुले किमया (KDS-७५३), ही असुन जमीनीच्‍या मगदुराप्रमाणे व पाण्‍याची उपलब्‍धता पाहुन वाणाची योग्‍य निवड करावी. ज्‍याठिकाणी संरक्षित ओलीताची सोय असेल व जमीन भारी असेल अशा ठिकाणी फुले संगम (KDS-७२६) , फुले दुर्वा, (KDS-९९२) सारखे वाण निवडावे या वाणासाठी जमीनीच्‍या मगदुराप्रमाणे टोकण पध्‍दतीने लागवडीकरीता एकरी १६ ते २० किलो बियाणे वापरावे.

पेरणी व पेरणीच्‍या पध्‍दती – सोयाबीन पिकाचे अधिक उत्‍पादन येण्‍यासाठी पेरणीची पध्‍दत योग्‍य निवडणे फार महत्‍वाचे आहे. सोयाबीन पिकास सुरुवातीच्या काळात पाणी कमी लागते पंरतु पावसाळा जास्‍त असल्‍याने पिक पाण्‍यात सापडुन योग्‍य वाढ होत नाही. हया उलट पिकास दाणे भरण्‍याच्या अवस्‍थेत पाण्‍याची जास्‍त गरज असते अशावेळी पावसात खंड असतो. त्यामुळे दाणे योग्‍य पध्‍दतीने भरत नाहीत. परिणामी उत्‍पादन कमी येते यावर मात करण्‍याकरीता पेरणीची योग्‍य पध्‍दत निवडुन पेरणी करावी. उदा – सरी वरंभा पध्‍दतीने टोकण लागवड, बेडवर लागवड किंवा बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करावी.

पेरणीची वेळ व खोली – पेरणीची वेळ ७ जुन ते १५ जुलै असुन पेरणी करण्‍यास उशिर झाल्‍यास कमी कालावधीचे वाण वापरावे. ७५ ते १०० मी. मी. पाऊस किंवा जमीन ६ इंच खोल ओलीची खात्री करुन वापसा आल्‍यानंतर पेरणी करावी. पेरणी करतांना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवरच पेरावे.

पेरणीचे अंतर – उभट वाढणारे वाण- हलकी जमीन ३० से.मी., मध्‍यम जमीन ३७.५ से.मी., भारी जमीन ४५ से.मी., जास्‍त फांदया करणारे वाण हलकी जमीन ४५ से.मी., मध्‍यम फांदया करणारे वाण मध्‍यम जमीन ४५ से.मी., जास्‍त फांदया करणारे मध्‍यम जमीन ५२.५ से.मी., मध्‍यम फांदया करणारी भारी जमीन ५२.५ से.मी., जास्‍त फांदया करणारे वाण भारी जमीन ६० से.मी., व जास्‍त फांदया करणारी खुप भारी जमीन ७५ से.मी. दोन ओळीतील अंतर ठेऊन पेरणी करावी.

तण नियंत्रण – जमीनीतील सेंद्रीय कर्ब व प्रति ग्रॅम जिवाणुची उपलब्‍धता लक्षात घेता शक्‍यतो तणनाशकाचा वापर टाळुन भौतिक पध्‍दतीने तण नियंत्रण करावे. अपवादात्‍मक परिस्‍थीतीतच तणनाशकाचा वापर पुढीलप्रमाणे करावा. सुरुवातीचे ३० ते ३५ दिवस पिक तणविरहीत ठेवावे.

पेरणीनंतर लगेचच (उगवणपुर्व) फ्लुमीऑक्‍झीन ५० टक्केएस.सी. ५ मी.ली. प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. किंवा पेरणीनंतर १५ ते २० दिवसाच्‍या दरम्‍यान तण दोन ते तिन पानावर असतांना इमॅझीथायपर २० मिली/१० लिटर पाणी, किंवा क्विझॅलोपॉप पी. इथाईल ५ टक्‍के इ.सी. २० मी.ली. प्रती १० लिटर पाणी. यापैकी कोणत्‍याही एका तणनाशकाची फवारणी नॅपसॅक पंपाद्वारेच करावी. तणनाशक फवारणीपुर्वी पंप स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवुन घ्‍यावे. तणनाशकाच्‍या फवारणीकरीता गढुळ पाण्‍याचा वापरु नये. तणनाशकाची फवारणी करतांना वापरण्‍यात येणारे पाणी आम्‍लधर्मी असावे. त्‍याकरीता लिटमस पेपरद्वारे तपासणी करावी. पाणी अल्‍कधर्मी असल्‍यास सिट्रीक अॅसिड मिसळुन पाणी आम्‍लधर्मी करुन वापरल्‍यास तणाचे प्रभावी नियंत्रण होते. फवारणी करीत असतांना जमीनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक आहे.

रासायनिक खत मात्रा – विद्यापिठाच्या शिफारशीनुसार व माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खताची मात्रा पेरणी बरोबर द्यावी. अकोला कृषी विद्यापिठाचे N – १२ : P-३० : K-१२ ची प्रति एकर शिफारस असुन बाजारात उपलब्‍ध असलेल्‍या रासायनिक खतामधुन ही मात्रा देण्‍यात यावी. तसेच १२:३२:१६, १०:२६:२६, १८:४६:०० इत्‍यादी संयुक्‍त खतामधुन मात्रा देत असल्‍यास एकरी ८ किलो गंधकाची मात्रा पेरणी बरोबर द्यावी. उभ्‍या सोयाबीन पिकास युरीया खत देऊ नये. यामुळे फायदा होण्‍याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता असते. चालु खरीप हंगामात इफकोद्वारे नॅनो डिएपी द्रवरुप (८:१६:०) उपलब्‍ध झालेला आहे. नॅनो डीएपी पिकास वापरावयाचे असल्‍यास पेरणीसोबत द्यावयाची रासायनिक खताची मात्रा ५० टक्‍के कमी वापरुन पेरणी करावी. पेरणीनंतर पिक ३० ते ३५ दिवसाचे असतांना २ ते ४ मी.ली. नॅनो डीएपी प्रति लिटर पाण्‍यात टाकुन फवारणी करावी.

नॅनो युरीया व नॅनो डीएपीचा वापर केल्यास पिकाच्या संवर्धनाबरोबरच पर्यावरण राखण्‍यास मदत होते. रासायनिक खतावरील खर्च कमी करता येऊ शकतो, तरी जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांनी याचा वापर करावा.

आंतरमशागत – सोयाबीन पिकाचा फुलावर येण्‍याचा कालावधी जातीपरत्‍वे ३५ ते ४५ दिवसांनी फुलधारणा होते. त्‍यामुळे आंतरमशागतीची कामे, कोळपणी, निंदणी इ. पिके फुलावर येण्‍यापुर्वी करुन घ्‍यावी. पिक फुलांवर असतांना आंतरमशागत करु नये.

एकात्‍मीक किड/ रोग व्‍यवस्‍थापन – सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात खोडमाशी ही किड येते. याकरीता ५ टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

विविध प्रकारच्‍या अळया जसे – उंटअळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी इत्‍यादीकरिता फेरोमेन ट्रॅप व ल्‍युर्स हेक्‍टरी १५ ते २० व पक्षी थांबे १५ ते २० लावावे. पिकांचे नियमित निरीक्षणे घ्‍यावी निरीक्षणात प्रति मिटर ३ ते ५ पेक्षा जास्‍त अळया आढळुन आल्‍यास किड आर्थिक नुकसान पातळीचे वर गेले असे समजुन योग्‍य किटकनाशकाची फवारणी करावी.

खोडमाशी या किडीसाठी पेरणीनंतर 10 ते 15 दिवसानी ट्रायझोफॉस २० मिली + ५ टक्‍के निंबोळी अर्क किंवा क्‍लोरॅंनट्रानीलीप्रोल १८.५ ईसी-३ मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात घेऊन या किटकनाशकाची फवारणी करावी. चक्रीभुंग्यासाठी पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी किंवा एखादे पान कडेने वाळू लागते व त्‍याची फांदी सुकलेली आढळते तेंव्हा ट्रायझोफॉस २० मिली + ५ टक्‍के निंबोळी अर्क किंवा क्‍लोरॅंनट्रानीलीप्रोल १८.५ ईसी-३ मिली या किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळया (स्‍पोडोप्‍टेरा, उंट, केसाळ व घाटे अळी) साठी सोयाबीन फुलोरा अवस्थेत असतांना क्‍लोरोपायरीफॉस किंवा क्विनॉलफॉस २० मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट ४ ग्रॅम,एकरी २० ते २५ पक्षी थांबे उभे करावेत. पाने खाणा-या अळ्या (स्‍पोडोप्‍टेरा, उंट, केसाळ व घाटे अळी) शेंगात दाणे भरतांना इमामेक्‍टीन बेंझोएट ४ ग्रॅम किंवा क्‍लोरॅंनट्रानीलीप्रोल १८.५ ईसी-३ मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंगाचा करपा प्रादुर्भाव दिसताच बावीस्‍टीन-१० ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच डायथेन- एम ४५-२५ ग्रॅम किंवा प्रोपॅकोनॅझोल १० मी.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिवळा मोझॅक व सोयाबीन मोझॅकचा प्रादुर्भाव दिसताच तातकाळ प्रादुर्भावग्रस्त रोपो नष्ट करावी. व रस सोशन करणाऱ्या या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 10 ते 20 निळे व पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टर वापरावे. जर पेट्रोल पंपाने फवारणी केल्यास किटकनाशकाचे प्रमाण तिप्पट करावे.

काढणी व मळणी – पिक परिपक्‍व झाल्‍यानंतर मजुराच्‍या सहाय्याने कापणी करुन मळणी यंत्राद्वारे मळणी करावी किंवा MAUS -१६२ सारखे वाण लागवड केले असल्‍यास हार्वेस्‍टरद्वारे मळणी करता येऊ शकते. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *