वर्धा, दि. १० ऑगस्ट २०२२ : आदिवासी समाज बांधवांनी पुर्वापार असलेली आदिवासी भाषा व संस्कृती अजूनही जपवून ठेवली आहे. यापूढे अशीच आदिवासी संस्कृतीतील चित्र व सांस्कृतिक जपवणूक करुन ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम व गौरव सोहळयात केले.
महात्मा पॅलेस येथे 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ, स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांच्याि वारस लीलाबाई सहदेव, भगवंतराव मसराम, आदिवासी सेवक महेंद्र शिंदे, आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त व्यवस्थापन महेश मसराम, प्राचार्य राजेंद्र मसराम आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या अहींसात्मक लढयाची चळवळ जगात भारतातून सुरु केली. सेवाग्राम येथून इंग्रजांना चलेजाव आंदोलनाची मुर्हुतमेढ रोवल्या गेली. आदिवासी समाजांनी आपल्या संस्कृतीचे व कलेचे जतन करण्यासाठी यामध्ये नवीन संकल्पना मांडल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवून अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच पूर्वापार चालत आलेली वारली चित्रकलेला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते जिल्हयातील आदिवासी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते आदिवासी समाजाच्या प्रेरणादायी वृत्तपत्र कात्रणे पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच आदिवासी योजनांच्या चित्रप्रदर्शनाचे सुध्दा उद्धाटन करण्यात आले. कार्यक्रमाला मोठया संख्येने आदिवासी बांधव, विद्यार्थी उपस्थित होते.
