सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (आजचा साक्षीदार) : कॅच द रेन जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत चांगले काम सुरू आहे. या नैसर्गिक स्त्रोतांचा पाझर टिकवण्या साठी पर्यावरण पूरक उत्सवांचे नियोजन करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर अमृत सरोवरांची संख्या 100 पर्यंत पूर्ण करावी त्यासाठी माझ्या शुभेच्छा अशा शब्दात जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी तसेच केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संचालक जयप्रकाश पांडे यांनी सूचना केली.
जलशक्ती अभियानांतर्गत आज जिल्ह्यातील कामांबाबत आढावा बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जलशक्ती अभियानाचे तांत्रिक अधिकारी जितेंद्र शिंपी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता विजय थोरात, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, उपवनसंरक्षक आर.डी.घुणकीकर आदी उपस्थित होते.
जल संधारणचे कार्यकारी अभियंता डी.वाय. दामा यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. तसेच संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी जिल्ह्यात सुरू असणाऱ्या कामांबाबत तसेच जिल्ह्याची संपूर्ण माहिती दिली. जिल्हाधिकारी म्हणाल्या, आझादीचा अमृत महोत्सव अंतर्गत या अभियानाची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
नोडल अधिकारी श्री. पांडे म्हणाले, सावंतवाडी येथील मोती तलावाबाबत सविस्तर प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा. त्याचबरोबर जिल्ह्यात गुरुत्वीय पद्धतीने पाणी योजना किती ठिकाणी करता येतील याबाबतही अभ्यास करावा. पारंपरिक जलस्त्रोतांचा पाझर टिकवून ठेवण्यासाठी गाळ काढण्याबाबत कार्यवाही करावी. जुन्या जलस्त्रोतांबाबत नोंदी ठेवाव्यात. पूर्वी आणि आता काय बदल झाले आहेत? त्याचाही विचार करावा. वाढत्या लोकसंख्या आणि नागरिकरणात नैसर्गिक, पारंपरिक जलस्त्रोतांची अवस्था काय आहे, त्याचे संवर्धन कसे करता येईल? याचाही अभ्यास करावा.
तांत्रिक अधिकारी श्री. शिंपी म्हणाले, गणेशमूर्ती तसेच दुर्गामूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन स्थळी तात्पुर्ता हौद बांधून त्याद्वारे विसर्जनाची प्रक्रिया करता येईल का याबाबतही प्रबोधन आणि जनजागृती करावी. यातून मूळ जलस्त्रोत टिकवता येऊ शकेल. ज्या ठिकाणी शक्य नाही अशा ठिकाणी दरवर्षी गाळ काढण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. बैठकीनंतर ही समिती जिल्ह्यातील विविध ठिकाणी पहाणी करण्यासाठी रवाना झाली.