यवतमाळ, दि 28 – कोविडच्या दोन वर्षानंतर प्रथमच निर्बंधमुक्त सन-उत्सव आपण साजरे करत आहोत, मात्र हे सन-उत्सव साजरे करतांना सर्व समाज बांधवांकडून शांततापुर्वक सामाजिक जबाबदारीचे पालन व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली.होते जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात आयोजित ‘हर घर तिरंगा’ मोहीम, समुह राष्ट्रगीत गायन व इतर कार्यक्रमांना सर्व समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला. यानिमित्त नागरिकांनी आपला जिल्हा शांतताप्रिय असल्याचा व एकतेचा संदेश सर्वांना दिला आहे. जिल्ह्यातील एकतेचा हाच संदेश आगामी सन उत्सव साजरे करतांनाही कायम ठेवावा. लोकमान्य टिळकांनाही गणेशोत्सव सुरू करतांना सामाजातील एकी हीच बाब अभिप्रेत होती, असे ते म्हणाले.
नवयुवकांनी शिस्तीचे पालन करावे, वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ नये, सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करावा, अफवा पसरणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.
सन उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनी त्यांना देणगीतून मिळणाऱ्या निधीचा उपयोग सकारात्मकपणे सामाजिक कार्यासाठी करावा. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना धीर देण्याचे काम आपण करावे. संकटग्रस्त शेतकरी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंब, कोविडमध्ये पालक गमावलेले मुले, शाळामध्ये पायाभूत सुविधा तसेच व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा.
रक्तदानाचे शिबीरे आयोजित करून जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ निर्माण करण्याचे कार्य करावे. आरटीओ मार्फत अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस योजनेबाबत तसेच कोविड बुस्टर डोज घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करने, पीएम किसान योजनेकरिता इ-केवायसी, मतदारकार्ड व आधार जोडणी व प्लॅस्टीक बंदी राबविण्यासाठी मदत करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच सन साजरे करतांना निष्काळजीपणामुळे कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आगामी सन उत्सवाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी पोलीस विभागामार्फत बंदोबस्ताची पुर्ण तयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्व सन-उत्सव निर्विघ्नपणे पार पडतील व कोणतेही गालबोट लागणार नाही तसेच समाजकंटकाडून उपद्रव होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांना आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हाभरातून आलेले शांतता समितीचे सदस्य राजेंद्र चिरडे, जफर एन खाँ, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रा. पुरूषोत्तम पाटील, ॲड. जयसिंग चव्हाण, मोहम्मद आसिम अली, पुरूषोत्तम निबरड, रिजवान भाई, शेख युनुस, चितांगराव कदम, असिफ अली, आनंद भुसारी, जैनुल सिद्धीकी, ॲड. बी.जे.देशमाने, दीपक आसेगावकर, प्रियंका बीडकर, बी.जी राठोड यांनी विविध सूचना मांडल्या. त्यात प्रामुख्याने डी.जे.च्या आवाजाला मर्यादा घालने, अतिक्रमण व होर्डिंग हटवने, शहरातील सि.सि.टी.व्ही. कॅमेरे सुरू करणे, गणेशमंडळाकडून रक्तदान शिबीराचे आयोजन करणे, गणेश विसर्जनाचे ठिकाणी ॲम्ब्युलन्स व तैराक बचाव पथक ठेवणे तसेच जिल्ह्यासाठी विकास समिती स्थापन करणे आदि सूचना करण्यात आल्या.
यावेळी प्रास्तावकेतून अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे यांनी जिल्हा शांतता समितीच्या आयोजनाबाबची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी व्यक्त केले.