पुणे, दि. ३०: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अंगणवाडी केंद्रे, शासकीय संस्थांसोबतच मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आणि अशासकीय संस्थांचाही सहभाग घेण्यात येणार आहे, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प (क्र. २) यांच्या कार्यालयाने दिली आहे.

प्रधानमंत्री कार्यालयाचा महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणून २०१८ मध्ये महिला व बाल विकास विभागाअंतर्गत पोषण अभियानाची सुरवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकाचे आरोग्य पोषण स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्यादृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावर्षीच्या पोषण महिन्यामध्ये महिला व स्वास्थ्य, बालक आणि शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण, लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ या बाबीवर मुख्यत्वे भर देण्यात आला आहे.
पोषण- महापोषण अभियान उपक्रमामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व १ हजार ४१३ अंगणवाडी केंद्र स्तरावर विविध स्पर्धा, शिबीरे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. बी. शिर्के यांनी कळवले आहे.