CBDT ची ई – जनजागृती मोहीम || आर्थिक वर्ष 2018-19 साठीची प्राप्तिकर विवरणपत्रे स्वयंस्फूर्तीने भरण्याबाबत…
करदात्यांच्या सुविधेसाठी आर्थिक वर्ष 2018-19 साठीची प्राप्तिकर विवरणपत्रे स्वतःहून भरण्याबाबत माहिती देणारी एक ‘ई-जनजागृती मोहीम’ 20 जुलै 2020 पासून सुरु करण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT – Central Board of Direct Taxes) घेतला आहे. ही 11 दिवसांची मोहीम 31 जुलै 2020 रोजी संपणार आहे.
ठळक बाबी
- जे करदाते करविवरण पत्र भरत नाहीत किंवा ज्यांचे करविवरणपत्रात त्रुटी किंवा अपूर्ण माहिती आहे, त्यांच्यासाठी विशेषत्वाने ही मोहीम राबवली जाणार आहे.
- या मोहिमेचे उद्दिष्ट करदात्यांना विवरणपत्रे भरण्यासाठी त्यांची करविषयक / इतर व्यवहारांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देणे हे आहे.
- प्राप्तीकर विभागाकडे या करदात्यांच्या ऑनलाईन व्यवहारांची जी माहिती असेल, ती त्यांना दिली जाणार. जेणेकरुन त्या आधारे, त्यांना स्वतःच, कोणाच्याही मदतीविना करविवरणपत्रे भरता येतील. या करदात्यांना विभागाची नोटीस किंवा छाननी असे प्रकार टाळता येतील.
- ही ई-मोहीम करदात्यांच्या सुविधेसाठी राबवली जाणार आहे. त्याअंतर्गत कर विभाग करदात्यांना मेल किंवा एसएमएस पाठवून त्यांनी केलेल्या व्यवहारांची पडताळणी केली जाणार. यात त्याच्या व्यवहारांची माहिती देणारे विविध स्त्रोत, जसे वित्तीय व्यवहार, टीडीएस, टीसीएस, परदेशातून आलेला पैसा इत्यादींचा वापर केला जाणार. त्याशिवाय, जीएसटी, निर्यात-आयात आणि समभाग बाजारात केलेल्या व्यवहारांशी संबंधित माहिती सुद्धा संकलित केली जाणार.
प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची, त्यात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 ही आहे. करदात्यांनी या ई मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन कर मंडळाने (CBDT – Central Board of Direct Taxes) केले आहे.