समाज कल्याण विभागाची भारत सरकार शिष्यवृत्ती योजना । अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीबाबत महाविद्यालयांनी 20 जानेवारीपूर्वी कार्यवाही करावी
जालना दि. १४ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनाबाबत जिल्ह्यातील एकुण 15 महाविद्यालयांकडे सातत्याने पत्रव्यवहार, कॅम्प घेऊनही अर्ज मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येत नाही. तरी ज्या महाविद्यालयांकडे जास्तीत जास्त अर्ज प्रलंबित आहेत. अशा महाविद्यालयांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीबाबत शुक्रवार दि. 20 जानेवारी 2023 पुर्वीच कार्यवाही करावी, असे निर्देश समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी करिता जालना जिल्ह्यातील महाविद्यालयांचे दि. 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2022 या कालावधील तालुकानिहाय महाविद्यालयांचे कॅम्प घेण्यात आले. चालु शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ अर्ज नोंदणी व अर्ज मंजुर करणे, शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडुन शिक्षण शुल्क वसुल न करणे, महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करणेबाबत तसेच प्रलंबित अर्जसंख्या जास्तीची असलेल्या संबंधित महाविद्यालयांनी दि. 20 जानेवारी 2023 पुर्वीच अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज मंजुर करण्याबाबत कार्यवाही करावी. समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सुचना दिल्या आहेत.
गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 पर्यंत अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे फक्त 5 हजार 862 अर्ज नोंदणी झालेले असुन मागील वर्षात नोंदणी झालेल्या 11 हजार 484 पेक्षा 5 हजार 622 अर्ज अद्यापही कमी नोंदणी झालेले आहेत. यापैकी 1 हजार 684 अर्ज महाविद्यालयांनी मंजुर केलेले असुन महाविद्यालय स्तरावर अद्यापही 3 हजार 895 प्रलंबित असुन महाविद्यालयांकडे सातत्याने पत्रव्यवहार, कॅम्प घेऊनही अर्ज मंजुरीबाबत कार्यवाही करत नसल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रलंबित अर्ज संख्यानिहाय राजकुंवर भाऊदेशिया सेवाभावी संस्था जालना संचलित, राजकुंवर कॉलेज जालना-218, कॉलेज ऑफ होम सायन्स-207, कोहिनूर वरिष्ठ महाविद्यालय जालना-185, जे.ई.एस. आर्टस, कॉमर्स आणि आर. बेझोंजी कॉलेज ऑफ सायन्स, जालना-145, राजश्री शाहू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय- 126, जेईएस कॉलेज, जालना-125, लाल बहादूर शास्त्री सीनियर कॉलेज, परतूर-111, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, जालना-99, व्ही.एस.एस. कॉलेज, जालना-76, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जालना कुंभेफळ-76, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा जि.जालना-73, मोरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय-71, सागर बी.सी.ए. कॉलेज जालना-70, राजकुवर बहुदेशीय सेवाभावी संस्था संचलित, शिवराज कॉलेज परतूर-67 आणि कॉलेज ऑफ फाइन आर्ट जालना-61 याप्रमाणे आहेत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.