उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे – कृषि सहसंचालकांचे आवाहन
ठाणे, दि. २७(आजचा साक्षीदार) : येत्या रब्बी (उन्हाळी) हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळी भात व भूईमूग पिकाचा विमा काढण्यासाठी व या योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढून या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पेरणी न होणे तसेच पूर दुष्काळ, यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे.
या योजनेसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत पीक विमा उतरविता येणार आहे. शेतकरी शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरून व विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून वैयक्तिकरित्याही योजनेत सहभागी होऊ शकतात.
बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीत नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता रक्कम व वरीलप्रमाणे कागदपत्रांसह अर्ज भरावेत, असे आवाहन कोकण विभाग विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.