स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राहाता तालुक्यात मोफत 7/12 वितरणाचा शुभारंभ… आजचा साक्षीदार |SAKSHIDAR
आजचा साक्षीदार |SAKSHIDAR : राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत सुधारित सातबारा वितरणाचा प्रारंभ आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहाता तालुक्यातील साकुरी येथे राहात्याच्या प्रधान न्यायाधिश आदिती आर. नागरी यांच्या हस्ते करण्यात आला. राहाता तालुक्यात विविध तीस ठिकाणी मोफत सात बारा वितरणाला सुरूवात करण्यात आली.
लोणी बुद्रुक येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शालिनीताई विखे पाटील यांना मोफत सात बारा उता-याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला पिंपळवाडी येथे शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते खातेदारांना सात बारा उता-याचे वितरण करण्यात आले.
या योजनेद्वारे तालुक्यातील खातेदारांना पहिल्या वेळेस सात बारा मोफत देण्यात येणार आहे. सर्व खातेदारांनी मोफत उतारा प्राप्त करून घ्यावा तसेच तो तपासून घेऊन, त्यामधे काही त्रुटी असल्यास त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात असे आवाहन राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.